दोडामार्ग – सावंतवाडी – आंबोलीमार्गे पुण्यासाठी पुन्हा एसटी बस सुरू होण्याचे संकेत., प्रवाशांमध्ये समाधान. ; सिंधुदुर्ग जनसेवा प्रतिष्ठान पुणेचे कार्याध्यक्ष रविकिरण गवस यांच्या प्रयत्नांची फलश्रुती.

सावंतवाडी :  दोडामार्ग – सावंतवाडी – आंबोलीमार्गे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, या मार्गावर नवीन एसटी बस सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून होत असलेल्या मागणीला यश मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

सिंधुदुर्ग जनसेवा प्रतिष्ठान, पुणे यांच्याकडून या मार्गावर बससेवा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. ही बस सुरू व्हावी यासाठी प्रतिष्ठांचे कार्याध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रविकिरण गवस यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या या प्रयत्नांना उत्तर देताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभाग, कणकवली यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.

दोडामार्ग–सावंतवाडी–आंबोलीमार्गे पुणे ही बससेवा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांसह नोकरदार, व्यावसायिक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः कोकण आणि पुणे यांदरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, सध्या सिंधुदुर्ग विभागात चालक, वाहक आणि बसेसची कमतरता असल्याचे महामंडळाने पत्रात नमूद केले आहे. मात्र नवीन बसेस उपलब्ध होताच या मागणीचा प्राधान्याने विचार करून संबंधित मार्गावर बससेवा सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

महामंडळाने दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत असून, ही बससेवा लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles