सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित तीन दिवसीय “असंघटित लोककलांचा महोत्सव” शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात सुरू झाला. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या महोत्सवाने रसिक प्रेक्षकांना अक्षरशः लोककलेच्या रंगमंचावर नेले.
येथील बॅ. नाथ पै सभागृह येथे २२, २३ आणि २४ मे या कालावधीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नाट्य दिग्दर्शक व अभिनेते गणेश ठाकूर, अभिनेत्री सोनल लेले, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, प्रा. रूपेश पाटील, विनायक गांवस, प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर, आर्यन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.



यावेळी बोलताना गणेश ठाकूर यांनी आजच्या डिजिटल युगात दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांकडे प्रेक्षकांचा ओढा कमी होत असल्याची खंत व्यक्त केली. “असंघटित लोककलांचा महोत्सव ही रसिकांसाठी एक सांस्कृतिक मेजवानी असून लुप्त होत चाललेल्या पारंपरिक लोककला जवळून अनुभवण्याची ही दुर्मीळ संधी आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी करपल्लवी गोंधळी, बहुरुपी, धनगरी ओवी, हेळवी लोककला, फुगडी आणि झिम्मा यांसारख्या पारंपरिक लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. शनिवारी आदिवासी पाटा गायन, खेळे कळसूत्री बाहुल्या, धिरो-धिरो नृत्य, मयूर नृत्य तसेच लैंगी बंजारा नृत्य सादर होणार आहे.
तर रविवारी कोकणच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडविणारे दशावतार नाटक, कोळी नृत्य, सोंगी मुखवटे, दिमडी, ढोलकी, ढोल-ताशा वाद्यवृंद जुगलबंदी आणि भारुड यांसारख्या लोकप्रिय लोककलांचा विशेष आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.



