पावसाळा तोंडावर अन् मोती तलाव पादचारी मार्गाचे काम रखडल्याने संजू परब संतप्त! ; जीर्ण सिमेंट पाईप, फुटपाथवरील धोकादायक स्थितीवर तातडीने उपाययोजनांच्या केल्या सूचना.

सावंतवाडी : पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपला असतानाही मोती तलाव परिसरातील पादचारी मार्गाचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी कामाच्या ठिकाणी भेट देत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अपूर्ण कामामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक नगरसेवक देव्या सूर्याजी उपस्थित होते.

मोती तलाव काठावर सुरू असलेल्या पादचारी मार्गाच्या कामाची पाहणी करताना फुटपाथखालील सिमेंट पाईप जीर्ण अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी संबंधित ठिकाणी योग्य ती खबरदारी घेऊनच काम करण्यात यावे, अन्यथा पावसाळ्यात गंभीर दुर्घटना घडू शकते, अशी सूचना त्यांनी नगरपालिकेच्या बांधकाम अधिकाऱ्यांना केली.

पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुंबणार नाही, यासाठी जलनिस्सारणाची प्रभावी व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. “कामे वेळेत आणि दर्जेदार झाली पाहिजेत; अन्यथा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागेल,” असा स्पष्ट इशाराच त्यांनी दिल्याची चर्चा परिसरात रंगली.

यावेळी स्थानिक नगरसेवक देव्या सुर्याजी यांनीही परिसरातील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. फुटपाथवरील अशोक वृक्ष वादळात कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर नव्याने वृक्षलागवड करण्यासाठी योग्य नियोजन करावे, तसेच उर्वरित झाडे पावसाळ्यात धोकादायक ठरू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

 

या पाहणीवेळी नगर परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता तुषार सरडे, मनोज राऊळ आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles