सिंधुदुर्गात पोलिसांच्या छत्रछायेखाली गुन्हेगारी फोफावली!, एसपी दहिकरांच्या हकालपट्टीसाठी आ. निलेश राणेंचा एल्गार! ; “गुन्हेगारांना पोलिसांचे अभय, भ्रष्ट अधिकाऱ्यांचे स्टिंग ऑपरेशन करणार!”, आ. राणेंचा थेट इशारा.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून गुन्हेगारांना पोलिसांचेच अभय मिळत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीला खतपाणी घालण्याचे काम सुरू असल्याचा घणाघाती आरोप करत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी शनिवारी पोलिस प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. दहिकर यांची तात्काळ हकालपट्टी करावी, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

सिंधुदुर्गनगरी येथील आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, युवक जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, जिल्हा परिषद सदस्य केशव नारकर आणि जिल्हा बँक संचालक संदीप परब यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

राणे म्हणाले, “२२ मे २०२५ रोजी डॉ. दहिकर यांनी जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात पोलिस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढत असताना दोषसिद्धीचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.”

गोवा बनावटीच्या अवैध दारू तस्करीचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी पोलिस प्रशासनावर थेट निशाणा साधला. “सिंधुदुर्गातून रोज अवैध दारूची वाहतूक होत असताना पोलिसांचे डोळे झाकलेले आहेत. कारवाई झालीच तर ती रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये दिसते; मात्र सिंधुदुर्गात मोठे रॅकेट सुरू असतानाही पोलिस निष्क्रिय आहेत. काही ठराविक वाहनांमधून सुरू असलेली ही तस्करी पोलिसांना दिसत नाही का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.

अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यावर बोलताना राणे यांनी पोलिसांच्या तपास पद्धतीवरही जोरदार टीका केली. “केवळ किरकोळ आरोपी पकडून पोलिस स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. मात्र ड्रग्ज आणि गांजा पुरवठ्यामागील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोलिस पोहोचत नाहीत. त्यामुळे आरोपी दुसऱ्याच दिवशी जामिनावर बाहेर येतात आणि अवैध धंदे पुन्हा सुरू करतात,” असे ते म्हणाले.

दोडामार्ग तालुक्यातील रबर लागवडीच्या नावाखाली गांजाची शेती होत असल्याचा गंभीर संशय व्यक्त करत त्यांनी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून संपूर्ण परिसराची चौकशी करावी, अशी मागणी केली. “सुमारे १८०० हेक्टर क्षेत्रात रबर लागवड आहे. त्या भागात सर्वसामान्यांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे या ठिकाणी नेमके काय सुरू आहे, याची चौकशी होणे आवश्यक आहे,” असे राणे म्हणाले.

गो-तस्करी, बेकायदा गोमांस विक्री आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या ध्वनिक्षेपकांच्या मुद्द्यावरही त्यांनी पोलिस प्रशासनाला धारेवर धरले. “जिल्ह्यात सुरू असलेल्या या बेकायदेशीर प्रकारांची माहिती सर्वांनाच आहे; पण पोलिस मात्र मौन बाळगून आहेत. नागरिकांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत शेवटी राणे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील (एलसीबी) काही अधिकाऱ्यांवर अत्यंत खळबळजनक आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला. “जिल्ह्यातील अवैध धंद्यांकडून कथित हप्ते गोळा करण्याचे काम काही पोलिस अधिकारी करत आहेत. या भ्रष्ट साखळीचा पर्दाफाश करण्यासाठी लवकरच स्टिंग ऑपरेशन करण्यात येणार आहे. त्यानंतर अनेकांचे चेहरे उघडे पडतील,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

“सिंधुदुर्गची शांतता, सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या या संपूर्ण परिस्थितीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करून सक्षम अधिकारी नियुक्त करावा,” अशी ठाम मागणी करत राणे यांनी पोलिस प्रशासनाविरुद्ध संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles