मोठी बातमी! – एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना आमदार, नेत्यांची तातडीची बैठक, महायुतीच्या गोटात हालचाली वाढल्या.

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कोकणातील नेते आणि आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, निलेश राणे आणि भरत गोगावले यांची उपस्थिती होती. रायगड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर सर्व आमदार आणि नेत्यांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांनी युती धर्म पाळावा अशी सूचना यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत.

मात्र दुसरीकडे अद्यापही रायगडच्या पालकमंत्रिपदावर कोणताही तोडगा निघालेला नाही.  दरम्यान रायगड विधान परिषदेची  जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीला गेल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते महेंद्र दळवींची मुलगी जुईल दळवी या आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचा निर्णय देखील या बैठकीमध्ये झाला आहे. रायगड विधान परिषदेमधून आता अनिकेत तटकरे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत.

असा आहे महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला –

समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या 6 जागांवर दावा करण्यात आला होता, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तीन जागांवर दावा करण्यात आला होता. तर दुसरीकडे भाजपची 17 पैकी 14 विधान परिषद मतदारसंघात अधिक ताकद असल्याने भाजपने 14 जागा लढवाव्यात अशी मागणी काही भाजप नेत्यांकडून होतं होती. त्यामुळे महायुतीमधील जागा वाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ गेले अनेक दिवस सुरू होतं.  अखेर आता महायुतीमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. भाजप 11 जागा लढवणार आहे, तर शिवसेना शिंदे गट 4 आणि अजित पवार गट 2 जागा लढवणार आहे.

त्यापैकी रायगडची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला गेली असून, इथून आता अनिकेत तटकरे हे विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. शिवसेनेच्या नेत्यांनी युतीचा धर्म पाळावा, अशा सूचना या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपले आमदार आणि नेत्यांना दिल्या आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles