रायगड : गेल्या काही वर्षांत अलिबाग हे अनेक सेलिब्रिटी, उद्योजग आणि क्रिकेटपटूंच्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. अनेकांनी अलिबागमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, विराट कोहली, दीपिका पादुकोण, क्रिती सनॉन, अक्षय खन्ना यांच्यापाठोपाठ आता साऊथ सुपरस्टारसुद्धा अलिबागकर झाला आहे. ‘केजीएफ’ स्टार यशने याठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

कागदपत्रांवरील माहितीनुसार ही प्रॉपर्टी किहीम बीचला लागून असलेल्या कामठ गावच्या किनारी भागात एका छोट्या बाजारपेठेच्या परिसरात आहे. या प्रॉपर्टीच्या एका बाजूला गावातील रस्ता आणि दुसऱ्या बाजूला समुद्र आहे. राधिका आणि यश यांनी या प्रॉपर्टीसाठी 1.44 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क, 60 हजार रुपयांचं नोंदणी शुल्क आणि 5200 रुपयांचं दस्तऐवजीकरण शुल्क भरलं आहे.

ही जमीन 1.3 एकर क्षेत्रात पसरलेली आहे. त्यावर आधीच एक घर बांधलेलं आहे. ‘डेक्कन हेराल्ड’मधील एका वृत्तानुसार, यश आणि राधिक या जमिनीवर एक अत्यंत आलिशान घर बांधण्याचं नियोजन करत आहेत. सुट्ट्यांमधील वेळ घालवण्याच्या दृष्टीने ते इथं ‘हॉलिडे होम’ बनवणार आहेत. ही प्रॉपर्टी किहीम बीचजवळ असल्याने तिथून थेट समुद्रकिनाऱ्यावर जाता येतं.
https://youtu.be/_gdI_-X83OU

यश आणि राधिका पंडित यांच्याकडे बंगळुरूमध्ये 6 ते 8 कोटी रुपये किमतीचं डुप्लेक्स घर आहे. याशिवाय कर्नाटकमध्ये त्यांच्या मालकीचं एक आलिशान फार्महाऊसदेखील आहे. या दोघांकडे अत्यंत महागड्या गाड्यांचं कलेक्शनसुद्धा आहे. कन्नड सुपरस्टार यश एका चित्रपटासाठी तब्बल 100 ते 150 कोटी रुपये मानधन घेत असल्याचं समजतंय.

आगामी बिग बजेट ‘रामायणम’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांसाठी त्याने तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेतल्याचं समजतंय. या चित्रपटात तो रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्याकडे एकूण 53 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं कळतंय. ‘केजीएफ’च्या दोन्ही भागांमुळे त्याला देशभरात प्रचंड प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली आहे.



