✍️ साबाजी परब.
सावंतवाडी : शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया असून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू देणार नाही. शासकीय योजनांमधून शाळेचा विकास होणारच आहे, मात्र अत्यावश्यक गरजांसाठी सरकारी प्रक्रियेची वाट न पाहता लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमीच आपल्या पाठीशी उभा राहीन, अशी ठाम ग्वाही माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य विक्रांत सावंत यांनी दिली.
चराठा येथील पी. एम. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शाळेच्या समस्या जाणून घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी तातडीने निर्णय घेतला.
यावेळी बोलताना श्री. सावंत म्हणाले, “आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होईल अशी कोणतीही परिस्थिती सहन केली जाणार नाही. त्यामुळे शाळेला आवश्यक त्या क्षमतेचा इन्व्हर्टर पुढील आठ दिवसांत उपलब्ध करून दिला जाईल.”
शाळेत आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असले तरी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर इन्व्हर्टर नसल्याने अध्यापन प्रक्रियेत व्यत्यय येत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. ही समस्या ऐकताच त्यांनी तातडीने इन्व्हर्टर उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थित ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

कार्यक्रमास सरपंच प्रचिती कुबल, उपसरपंच राजन परब, माजी सरपंच बाळू वाळके, ग्रामविकास अधिकारी श्रद्धा तेंडोलकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश परब, दिगंबर पावसकर, सामाजिक कार्यकर्ते राजू कुबल, बाळ्या बोंद्रे, प्रवीण सावंत, विलास परब, मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर, निलेश मेस्त्री, विष्णू परब, शमिका नाईक, शिक्षिका अदिती चव्हाण, अमिषा कुंभार, धनदा शिंदे, संगीत शिक्षक विजय माधव, क्रीडा शिक्षक नागेश बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी सरपंच बाळू वाळके यांनीही मनोगत व्यक्त करत शाळेच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका धनदा शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका अमिषा कुंभार यांनी केले.


