सावंतवाडी : सायबर गुन्हेगारांकडून विविध आमिषे व धमक्या देऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील सातार्डा परिसरातील एका युवकाची अशाच प्रकारे ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाला अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप व्हॉइस कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने “एका मुलीने तुम्हाला कॉल केला होता. तिच्याकडे तुमचा व्हिडिओ आहे आणि तो ती सोशल मीडियावर अपलोड करणार आहे. तसेच तुमच्या कुटुंबीयांवर कारवाई होईल,” अशी खोटी भीती दाखवून धमकावले. या धमकीमुळे युवक घाबरून गेला आणि त्याने टप्प्याटप्प्याने सुमारे ७८ हजार रुपये संबंधित अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर पाठविले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर युवकाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत व्यवहारातील ४३ हजार रुपये होल्ड करण्यात यश मिळविले आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही स्वतःला पोलीस, न्यायाधीश, सीबीआय किंवा सीआयडी अधिकारी असल्याचे सांगून फोन किंवा संदेशाद्वारे धमकावत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारच्या कॉलमुळे घाबरून जाऊन कोणालाही पैसे पाठवू नयेत. कोणतीही शंका अथवा तक्रार असल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण करीत आहेत.



