सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमीच्या वतीने सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कॅरम व बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पाच वर्षांवरील मुला-मुलींसाठी आयोजित या शिबिरात तब्बल ९७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
खासकीलवाडा येथील पाटणकर वाड्यात असलेल्या मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात हे शिबिर पार पडले. सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग आणि कणकवली परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
शिबिराचे उद्घाटन कणकवली येथील सॉफ्टवेअर उद्योजक प्रवीण सोनार यांच्या हस्ते झाले. यावेळी मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी गेल्या दहा वर्षांतील ॲकेडमीच्या वाटचालीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांमध्ये कॅरम व बुद्धिबळ या बौद्धिक खेळांची आवड निर्माण करण्यासाठी ॲकेडमी सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवीण सोनार यांनी मुक्ताई ॲकेडमीच्या कार्याचे कौतुक करत, गेल्या दशकभरात विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केल्याचे नमूद केले. तसेच ॲकेडमीला मिळालेला “बेस्ट ॲकेडमी” पुरस्कार हा संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी कॅरम व बुद्धिबळ प्रशिक्षणाचा लाभ घेऊन स्पर्धात्मक क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रशिक्षण शिबिरात कौस्तुभ पेडणेकर यांनी कॅरम, तर बाळकृष्ण पेडणेकर यांनी बुद्धिबळ खेळाचे प्राथमिक प्रशिक्षण दिले. शालेय तसेच विविध स्पर्धांमधील संधी, खेळाचे मानसिक व बौद्धिक फायदे याविषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कणकवली येथील राज्यस्तरीय कॅरमपटू जान्हवी सोनार हिचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील पहिले बुद्धिबळ राज्य पंच (आर्बिटर) म्हणून बाळकृष्ण पेडणेकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
शिबिराच्या समारोपावेळी कौस्तुभ पेडणेकर यांनी लवकरच तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.



