संघटनेच्या बळावरच समाजाचा विकास!, बेलदार भटका समाजाच्या प्रश्नांसाठी राज्य संघटना खंबीरपणे पाठीशी! :  रमेश जाधव. ; सिंधुदुर्गातील पहिल्या नोंदणीकृत संघटनेच्या कार्याचे राज्याध्यक्षांकडून कौतुक!,  जात वैधता प्रश्नासाठी विशेष शिबिराचे आश्वासन, ऑगस्टमध्ये भव्य जिल्हास्तरीय मेळाव्याची घोषणा!

कुडाळ : समाज संघटित झाला तरच विकासाची वाट अधिक वेगाने खुली होते, या विचाराला अधोरेखित करत बेलदार भटका समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी राज्य संघटना प्रत्येक टप्प्यावर खंबीरपणे उभी राहील, असा ठाम विश्वास बेलदार भटका समाज, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी व्यक्त केला. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेलदार भटका समाज संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या कार्याचा आढावा घेत समाजाच्या विकासासाठी भावी दिशा निश्चित करण्यात आली.
यावेळी बोलताना रमेश जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन झालेली बेलदार भटका समाज संघटना ही राज्यातील पहिली नोंदणीकृत (रजिस्टर) संघटना असल्याचे सांगत तिच्या कार्याचे विशेष कौतुक केले. संघटनेने अल्पावधीत समाजात एकजूट निर्माण करून विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडली असून, हा आदर्श इतर जिल्ह्यांनीही घ्यावा, असे त्यांनी नमूद केले. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटनेने सातत्याने कार्यरत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.


समाजासमोरील विविध प्रश्नांचा आढावा घेताना त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र आणि जातीच्या दाखल्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. विशेषतः १९६१ पूर्वीच्या पुराव्याच्या अटीमुळे अनेक समाजबांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यात आणि शिक्षण-नोकरीच्या संधी मिळविण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तसेच संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच विशेष शिबिर आयोजित करण्यात येईल. या शिबिराच्या माध्यमातून समाजबांधवांना जातीचे दाखले आणि जात वैधता प्रक्रियेत आवश्यक ते मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
समाजातील युवक, विद्यार्थी, महिला आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या गुणवंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ऑगस्ट महिन्यात भव्य जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या मेळाव्यात शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात येणार असून, या उपक्रमातून समाजात नवी ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेदरम्यान समाजाच्या संघटनात्मक विस्तार, शैक्षणिक प्रगती, शासकीय योजनांचा लाभ, युवकांचे सक्षमीकरण आणि सामाजिक ऐक्य या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. समाजाच्या विकासासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने गावागावांत संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष संजय चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मारुती मोहिते, उपाध्यक्ष गणेश जाधव, सचिव महादेव पवार, सल्लागार वसंत जाधव, सदस्य किरण चव्हाण, रोहिदास पवार, विकास जाधव, रोशन चव्हाण, अशोक मोहिते, रमेश पवार, बाळकृष्ण जाधव, दिनेश जाधव, रावसाहेब पवार, अंकुश पवार, सतीश पवार, श्रीमती पूजा जाधव, वैभव मोहिते यांच्यासह जिल्हाभरातील बेलदार भटका समाज संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles