सावंतवाडी : तालुक्यातील मौजे गुळदुवे येथील एका जमीन प्रकरणाने पुन्हा एकदा जिल्ह्यातील भू-माफियांच्या वाढत्या हस्तक्षेपाचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. अनेक वर्षांपासून कथित भू-माफियांच्या ताब्यात असलेली जमीन शासनाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ जमीनमालकाच्या नावे देण्याचा निर्णय घेतला असून, संबंधित मालकाला त्याचा कायदेशीर हक्क प्राप्त झाला आहे.
मात्र, हा निर्णय झाल्यानंतरही काही भू-माफिया आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या काही राजकीय व्यक्तींकडून शासनावर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, शासनाच्या निर्णयात अडथळे निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
या संपूर्ण प्रकरणात माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांच्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शासनाने महसूल विभागाच्या सर्व नियमांचे पालन करून आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित जमीन मूळ मालकाच्या नावे करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या निर्णयाला विरोध करणे आणि दबावतंत्राचा वापर करणे हे कायद्याच्या राज्यालाच आव्हान देणारे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
गुळदुवे ग्रामस्थांनी शासन आणि जिल्हा प्रशासनाला आवाहन करत, भू-माफियांच्या दबावाला बळी न पडता कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी आणि मूळ जमीनमालकाला संपूर्ण संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.
“कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. शासनाने दिलेल्या न्यायाला धक्का लावणाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे,” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.



