आडाळी एमआयडीसीत विकासाचा नवा अध्याय!, उद्योजक पै-काणे यांची १०० कोटींची गुंतवणूक, शेकडो युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी! ; आमदार दीपक केसरकर यांची घोषणा! ; ‘माझ्या वाढदिवसाची मित्राकडून अनमोल भेट!’

सावंतवाडी : सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारी मोठी घोषणा सावंतवाडीत करण्यात आली. दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीमध्ये तब्बल १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत अत्याधुनिक डेटा सेंटर कंटेनर उत्पादन प्रकल्प उभारला जाणार असून, या माध्यमातून शेकडो स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. ही माहिती माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे, “माझ्या वाढदिवसानिमित्त माझे मित्र उद्योजक सुनील पैकाणे यांनी दिलेली ही अनमोल भेट आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी क्रिएटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मालक सुनील पैकाणे आणि संचालक संदीप रेडकर उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, २०१० मध्ये बांदा-वाफोली येथे सुरू झालेल्या पैकाणे यांच्या उद्योगसमूहात आज सुमारे ७०० स्थानिक युवक कार्यरत आहेत. त्याच धर्तीवर आता आडाळी एमआयडीसीमध्ये शंभर कोटींची गुंतवणूक करून अत्याधुनिक प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी उद्या मुंबईत उद्योग मंत्र्यांसोबत बैठक होणार असून कंपनीला सहा एकर जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

यामुळे आडाळी एमआयडीसीला नवसंजीवनी मिळणार असून परिसरातील युवकांसाठी रोजगाराचे नवे दालन खुले होणार आहे. तसेच प्रत्येक गुरुवारी एमआयडीसीचे अधिकारी आडाळी येथे उपलब्ध राहतील, अशी माहितीही त्यांनी दिली. “आडाळी एमआयडीसीत अधिकाधिक उद्योग आणून सिंधुदुर्गातील तरुणांना रोजगार देणे हेच माझे ध्येय आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्योजक सुनील पैकाणे म्हणाले, “जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर सहा ते आठ महिन्यांत उत्पादन सुरू करण्याचे नियोजन आहे. कंपनीत दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय शिक्षण घेतलेल्या स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार दिला जाईल. आम्ही जिथे उद्योग उभारतो, तिथल्या स्थानिकांना प्रथम संधी देण्याची आमची परंपरा आहे. वाफोली येथे आमचे चार कारखाने असून, जागा उपलब्ध झाल्यास आणखी विस्तार करण्यात येईल.”

विकासकामांचा वेग कायम राहणार

यावेळी केसरकर यांनी मतदारसंघातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचीही माहिती दिली. सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच पूर्णत्वास जाणार असून दोडामार्ग रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. वेंगुर्ला आणि शिरोडा येथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे.

सावंतवाडीत बीओटी तत्त्वावर आधुनिक ‘बस पोर्ट’, पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून बोट बांधणी उद्योग, तिलारी येथे अॅम्युझमेंट पार्क, वॉटर स्पोर्ट्स व अॅनिमल सेंटर, आंबोलीत गोल्फ कोर्स व अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, तसेच सावंतवाडीत शिर्डीच्या धर्तीवर भव्य साई मंदिर उभारण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

यासाठी वडील वसंतशेठ केसरकर यांच्या नावाने चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून गरजूंना मदत आणि मंदिर उभारणीचे कार्य हाती घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्व. अजित पवारांविषयी व्यक्त केल्या भावना-

पत्रकार परिषदेत केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख केला. तसेच स्वर्गीय अजित पवार यांच्याबद्दलही आदर व्यक्त करत, “ते मला एकेरी नावाने हाक मारायचे. त्यांच्यासोबत अर्थसंकल्पाच्या कामात अनेकदा सहभागी होण्याची संधी मिळाली,” अशी आठवण त्यांनी सांगितली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही हे स्नेहबंध कायम ठेवले असल्याचे त्यांनी नमूद केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles