३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर प्रा. अरविंद बिराजदार सेवानिवृत्त. ; खर्डेकर महाविद्यालयात मान्यवर, सहकारी, विद्यार्थी व कुटुंबीयांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न.

वेंगुर्ला : येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील उद्यानविद्या विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक अरविंद कल्लाप्पा बिराजदार हे तब्बल ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्त महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गौरव सोहळ्यात त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, निवृत्त अभियंता अनिल जाधव, कवी वीरधवल परब, पत्रकार महेंद्र मातोंडकर, नगरसेवक प्रशांत आपटे, माजी मुख्याध्यापक दादा सोकटे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, पर्यवेक्षक डी. जे. शितोळे, व्यासायिक अभ्यासक्रम प्रमुख प्रा. डी. एस. पाटील, अधिक्षक संभाजी पाटील, संजय पाटील, प्रा. वामन गावडे, प्रा. एस. टी. भेंडवडे, संजू परब, सावळे व वामन धुरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, विद्यार्थी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रा. अरविंद बिराजदार यांचा जन्म १२ जून १९६८ रोजी झाला. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवली. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कलगी येथे, माध्यमिक शिक्षण मंगळवेढा येथे तर बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला येथे झाले. खर्डेकर महाविद्यालयातील गणित विभागाचे प्रा. जी. एस. पाटील यांच्या माध्यमातून त्यांचा वेंगुर्ल्याशी संपर्क आला. तत्कालीन प्राचार्य एम. एच. कदम यांनी सुरू केलेल्या “कमवा आणि शिका” योजनेचा लाभ घेत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि जीवनाला नवी दिशा मिळवली.

बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असताना त्यांनी उद्यानविद्या विषयात विशेष प्राविण्य मिळवत बी.एस्सी. ॲग्री पदवीसाठी प्रवेश मिळविला. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही शैक्षणिक कर्जाच्या मदतीने त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ३ जुलै १९९२ रोजी त्यांनी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात सेवेला सुरुवात केली. सेवाकाळात त्यांनी उद्यानविद्या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कृषी व उद्यानविद्या विषयाची आवड निर्माण केली. नर्सरी व्यवसाय, कलम बांधणी, फळबाग विकास, आंबा, मिरी, दालचिनी यांसारख्या पिकांच्या लागवडीचे प्रशिक्षण देऊन अनेक विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविला.
नोकरी करत असतानाच त्यांनी एम.एस्सी. (पर्यावरणशास्त्र) तसेच एलएलबी या पदव्या संपादन केल्या. स्पर्धा परीक्षांची मनोभावे तयारी करून त्यांनी व्यापक अध्ययन केले. अंतिम टप्प्यात राजपत्रित अधिकारी होण्याची संधी थोडक्यात हुकली असली तरी त्या अभ्यासातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी केला. स्पर्धा परीक्षा, करिअर नियोजन आणि व्यापक वाचन याबाबत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत यशस्वी झाले असून अनेकजण शासकीय सेवेत कार्यरत आहेत.
आपल्या सेवाकाळात त्यांनी केवळ विद्यार्थ्यांच्याच नव्हे तर कुटुंबाच्या उन्नतीसाठीही मोठे योगदान दिले. आईच्या सहकार्याने त्यांनी धाकट्या भावंडांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोलाची मदत केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही भाऊ आज शासकीय सेवेत कार्यरत आहेत. विवाहानंतरही कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणासाठी व प्रगतीसाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून प्रा. बिराजदार यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव केला. कोणतेही काम लहान अथवा मोठे न समजता जबाबदारीने पार पाडणारे, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आणि समाजात विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
यावेळी प्रा. बिराजदार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन शिक्षेकेतर कर्मचारी, व्यावसायिक अभ्यासक्रम, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाकडून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास त्यांच्या पत्नी विरश्री बिराजदार, कन्या प्रीती बिराजदार तसेच सुपुत्र प्रबल बिराजदार उपस्थित होते. उत्तरादाखल बोलताना प्रा. बिराजदार यांनी आपल्या यशाचे श्रेय आई, कुटुंबीय, प्राचार्य एम. एच. कदम, सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी आणि महाविद्यालय व्यवस्थापनाला आणि शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर यांना दिले. खर्डेकर महाविद्यालयाने आयुष्य घडविले असून या संस्थेचे ऋण आयुष्यभर स्मरणात राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी केले. त्यांनी प्रा. बिराजदार यांच्या जीवनप्रवासातील विविध पैलूंना उजाळा देत उपस्थितांना त्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी वाटचालीची माहिती दिली. डॉ. डी. एस. पाटील यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व हितचिंतकांचे आभार मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles