सावंतवाडी : महिला शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला बळ देणारा आणि काजू उद्योगाला नवी चालना देणारा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) व स्मार्ट प्रकल्पांतर्गत अनमोल प्रभागसंघ तळवडे कार्यक्षेत्रातील ‘भूमिमाता महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड, मळगाव’ यांच्या अत्याधुनिक २ टन प्रतिदिन (2 TPD) क्षमतेच्या काजू प्रक्रिया युनिटच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी नेमळे-पेंडूरकरवाडी (ता. सावंतवाडी) येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
स्मार्ट उपप्रकल्पांतर्गत मंजूर झालेल्या ५८.४० लाख रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये ६० टक्के अनुदान उपलब्ध असून, या इमारतीमुळे कंपनीचे प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम होणार आहे. तसेच महिला शेतकऱ्यांना प्रक्रिया, साठवणूक, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याने त्यांच्या उत्पादनाला अधिक मूल्यवर्धन मिळण्यास मदत होणार आहे.
या इमारतीचे भूमिपूजन सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सौ. सुस्मिता जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, उमेद (MSRLM) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनीच्या (FPC) इमारतीचे हे पहिलेच भूमिपूजन ठरल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाचे जिल्हा व्यवस्थापक अभिजित परब यांनी महिला शेतकऱ्यांनी संघटित पद्धतीने कार्य करून शेतीमालावर प्रक्रिया, मूल्यवर्धन, साठवणूक आणि थेट बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचे महत्त्व अधोरेखित केले. शेतकरी उत्पादक कंपन्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याबरोबरच महिलांना स्वावलंबी बनविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.
सभापती सुस्मिता जाधव यांनी भूमिमाता महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत हा प्रकल्प परिसरातील महिला शेतकऱ्यांसाठी विकासाचे नवे दालन ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमास तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, सावंतवाडीच्या बीएमएम स्वाती रेडकर, तळवडे प्रभाग समन्वयक सचिन नाईक, भूमिमाता महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्षा निकिता बुगडे, सचिव रुपाली गुडेकर, कोषाध्यक्ष मयुरी दळवी, संचालक विशाखा ठाकूर, रंजना तेली, दीपाली हरमलकर, हर्षदा पेडणेकर आणि मनाली परब यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, अनमोल प्रभागसंघाचे सर्व कॅडर आणि कंपनीच्या महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन उत्कृष्टरीत्या पार पडले. शेवटी कंपनीच्या सचिव रुपाली गुडेकर यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, ग्रामस्थ व महिला सभासदांचे आभार मानले.



