सावंतवाडी : सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाच्या वतीने अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र (FOSTAC) कार्यक्रम गुरुवार, २३ जुलै रोजी सावंतवाडी नगरपालिकेच्या इंदिरा गांधी संकुलातील बॅ. नाथ पै सभागृहात दुपारी २ ते ६ या वेळेत उत्साहात पार पडला. खाद्यपदार्थाशी संबंधित विविध व्यवसायांतील व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
या प्रशिक्षणामध्ये किराणा दुकानदार, हॉटेल व खानावळ चालक, बेकरी व्यावसायिक, फरसाण व मिठाई उत्पादक, कोल्ड्रिंक्स विक्रेते, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, वडापाव स्टॉल चालक, चायनीज खाद्यपदार्थ विक्रेते, अंडी, चिकन व मटण विक्रेते तसेच अन्नपदार्थ साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष तथा व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन वाळके होते. उद्घाटन सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह राजू जठार, उपाध्यक्ष पुंडलिक दळवी, सावंतवाडी तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, उपाध्यक्ष तथा नगरसेवक आनंद नेवगी, महिला व्यापारी अध्यक्षा सौ. सुजाता परब, अन्नसुरक्षा प्रशिक्षक अंकुश जोगदंड (पुणे) व सौ. सीमा मठकर, तसेच बांदा, सातार्डे, आंबोली, मळगाव, आरोंदा व तळवडे व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद नेवगी यांनी केले.
उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना सौ. श्रद्धा सावंत-भोसले म्हणाल्या की, “स्वतः हॉटेल व्यवसाय करत असल्याने अन्नसुरक्षा कायद्याचे प्रशिक्षण घेऊन नियमांचे काटेकोर पालन करत आहोत. प्रत्येक व्यावसायिकाने कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करणे आवश्यक असून, समाजाच्या आरोग्यासाठी अन्नसुरक्षा नियमांचे पालन अत्यंत महत्त्वाचे आहे.”
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह राजू जठार यांनी अन्नपदार्थ हाताळताना स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी कॅप व हातमोजे वापरणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. तळण्यासाठी वापरलेले तेल दोन वेळांपेक्षा अधिक वापरू नये, वापरलेले तेल स्वतंत्र साठवावे, तसेच वडापाव, समोसा, भजी आदी पदार्थ केमिकलयुक्त छापील रद्दी कागदात देऊ नयेत, अशा महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिल्या. व्यवसायाच्या ठिकाणी धूम्रपान किंवा मद्यपान आढळल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते तसेच कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय समारोपात नितीन वाळके म्हणाले की, सिंधुदुर्गचा स्वच्छ व पर्यटनप्रधान जिल्हा म्हणून विकास होत असून भविष्यात व्यापारालाही मोठी संधी आहे. अन्नसुरक्षा कायदा पूर्वीपासून लागू असला तरी आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या पुढाकारामुळे त्याची प्रभावी अंमलबजावणी व जनजागृती सुरू झाली आहे. त्यामुळे अन्न व्यवसायाशी संबंधित प्रत्येक व्यापाऱ्याने नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेवक प्रतिक बांदेकर, अभय पंडित, रंजन रेडकर, आसिफ बिजली, संदेश परब, दत्ता सावंत, श्रीपाद चोडणकर, मंदार केरकर, अजित सावंत, बंटी वराडकर, किरण सिध्ये, सौ. पूजा दळवी, दीपा मुद्राळे, संतोष मुंज, प्रणव शिरोडकर यांच्यासह तालुक्यातील व शेजारील भागातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला व्यापाऱ्यांची उपस्थितीही उल्लेखनीय होती.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले.



