बांदा : केवळ आठ महिन्यांच्या आजारी बाळाला घरातच सोडून एक महिला अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना बांदा येथे समोर आली आहे. पूजा चौहान असे बेपत्ता महिलेचे नाव असून, गेल्या दहा दिवसांपासून तिचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बांदा पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत.
याप्रकरणी संगीता खडसे-राऊळ यांनी बांदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा चौहान ही महिला गेल्या पाच-सहा महिन्यांपासून संगीता राऊळ यांच्या घरी घरकाम करत होती. ती आपल्या आठ महिन्यांच्या ‘यश’ या बाळासह राऊळ कुटुंबासोबत राहत होती.
आजारी बाळावर उपचार करून घरी परतले अन्…
२१ जुलै रोजी सकाळी संगीता राऊळ या कामानिमित्त कोलझर येथील समाजसेवा हायस्कूलमध्ये गेल्या होत्या. याचदरम्यान बाळ यशची प्रकृती बिघडल्याने महेंद्र राऊळ यांनी पूजा चौहान हिच्यासह बाळाला उपचारासाठी सावंतवाडी येथे नेले. उपचारानंतर दोघे दुपारी घरी परतले.
सुमारे दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास पूजा चौहान हिने आजारी बाळाला घरातच सोडले आणि कोणालाही काहीही न सांगता घराबाहेर पडली. त्यानंतर तिचा कोणताही संपर्क झालेला नाही.
बाळाची जबाबदारी बाल कल्याण समितीकडे –
आई अचानक बेपत्ता झाल्यानंतर आजारी बाळाला बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार प्रथम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर समितीच्या पुढील आदेशानुसार बाळाला एका सामाजिक संस्थेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मोबाईल नाही, ओळखपत्रही नाही; तपासासमोर मोठे आव्हान –
प्रभारी पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके कार्यरत आहेत. पूजा चौहान नेमकी कोणत्या भागातील आहे, तिची खरी ओळख काय आहे, याचाही तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, संबंधित महिलेच्या जवळ मोबाईल फोन, आधारकार्ड किंवा अन्य ओळखपत्र नसल्याने तिचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या तपासणी नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात आले आहे.
मात्र, घटनेच्या दिवशी बांदा परिसरात वीजपुरवठा खंडित असल्याने अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. त्यामुळे तपासात अडचणी निर्माण होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दहा दिवस उलटले; प्रश्न मात्र अनुत्तरित!
घटनेला तब्बल दहा दिवस उलटूनही महिलेचा शोध लागलेला नसल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. एवढ्या लहान आणि आजारी बाळाला घरात सोडून महिला अचानक का निघून गेली? ती स्वतःहून बेपत्ता झाली की तिच्यामागे अन्य काही कारण आहे? तिच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला आहे का? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
तसेच संबंधित महिलेची खरी ओळख, तिची पार्श्वभूमी आणि बाळाशी असलेले तिचे नाते याबाबतही पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणामागे काही वेगळे कारण किंवा अन्य कोणता प्रकार आहे का, याचाही तपास व्हावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
मात्र, या सर्व शक्यतांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासातूनच या प्रकरणाचे नेमके गूढ उलगडणार आहे.
एसपींनी लक्ष घालण्याची नागरिकांची मागणी –
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून तपासाची व्याप्ती वाढवावी, महिलेचा शोध युद्धपातळीवर घ्यावा आणि तिच्या बेपत्ता होण्यामागील सर्व शक्य कारणांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सध्या बांदा पोलीस महिलेचा शोध घेण्यासाठी विविध दिशांनी तपास करत असून, आठ महिन्यांच्या त्या चिमुकल्याला मागे ठेवून बेपत्ता झालेल्या महिलेच्या शोधाकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.



