कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या विविध समस्या, तक्रारी आणि वीज विभागाच्या कार्यपद्धतीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यासाठी वीज विभागाच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाचे (CGRF) सिंधुदुर्ग सर्कलचे चेअरपर्सन राजाराम झेंडे आणि मेंबर प्रशांत पुजारी यांच्याशी बुधवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता कुडाळ येथे सदिच्छा भेट व चर्चा आयोजित करण्यात आली आहे.
या भेटीत CGRF चे कार्य कशा पद्धतीने चालते, ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण कसे केले जाते, तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, ग्राहकांना मिळणारे अधिकार तसेच वीज विभागाकडून होणाऱ्या तक्रारींच्या निवारणातील अडचणी याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या वीज खंडित होणे, वाढीव वीजबिले, स्मार्ट मीटर, चुकीचे बिलिंग, ट्रान्सफॉर्मर व वीज वाहिन्यांच्या समस्या, तक्रारींचे विलंबित निवारण यांसह अनेक प्रश्नांमुळे ग्राहक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर CGRFच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत होणारी ही चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
“वीज ग्राहकांनी केवळ तक्रारी करत न बसता आपल्या हक्कांची आणि तक्रार निवारणाच्या उपलब्ध कायदेशीर यंत्रणेची माहिती करून घेणे गरजेचे आहे. CGRFच्या कार्यपद्धतीबाबत थेट माहिती घेण्यासाठी व आपल्या समस्या मांडण्यासाठी वीजबाधित ग्राहकांनी या चर्चेला उपस्थित राहावे,” असे आवाहन वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
वीज ग्राहकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळणार असल्याने बुधवारची ही बैठक ग्राहकांसाठी महत्त्वाची ठरणार असून, आपल्या समस्या घेऊन अधिकाधिक ग्राहकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.



