सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव डिजिटल उपक्रमाची सुरुवात होत असून, निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलमध्ये ‘व्हर्च्युअल विद्यापीठ’च्या माध्यमातून OTT (Over The Top) शैक्षणिक चॅनेल सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन १४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.४५ वाजता होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल, संगणक तसेच स्मार्ट टीव्हीच्या सहाय्याने अध्यापनाशी संबंधित दर्जेदार डिजिटल व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आपल्या सोयीनुसार आणि वेळेनुसार अभ्यास करू शकणार आहेत.
शाळेचे स्वतःचे खासगी शैक्षणिक चॅनेल असणार असून, त्यावर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी निगडित विविध शैक्षणिक साहित्य उपलब्ध होईल. Chetana Education यांच्या पुस्तकांशी व अभ्यासक्रमाशी सुसंगत उच्च दर्जाचे शैक्षणिक व्हिडिओ विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत. यासोबतच शाळेच्या शिक्षक व टीमने तयार केलेले विशेष व्हिडिओ तसेच विद्यार्थ्यांच्या विविध सहशालेय उपक्रमांचे दर्शन घडविणारे साहित्यही या चॅनेलवर उपलब्ध होणार आहे.
ही डिजिटल शिक्षण सुविधा वेब, Android आणि iOS उपकरणे, Android TV तसेच Fire TV अशा विविध माध्यमांवर उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या मोठ्या स्क्रीनवरही अभ्यास करता येईल. पालकांनाही मुलांसोबत सहभागी होत त्यांच्या अध्ययन प्रक्रियेवर लक्ष ठेवता येणार आहे.
विशेष म्हणजे हे व्यासपीठ जाहिरातीविरहित, सुरक्षित आणि विद्यार्थ्यांसाठी अनुकूल असणार आहे. अनावश्यक विचलित करणाऱ्या घटकांपासून मुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा लाभ मिळणार असून, अनुचित सामग्रीपासूनही संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि सुरक्षित वापर करण्याच्या दिशेने संस्कार नॅशनल स्कूल निरवडेचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सिंधुदुर्गातील शालेय शिक्षणासाठी एक नवा डिजिटल अध्याय ठरणार आहे.



