सावंतवाडी : सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात झालेली पंचायत समितीची आमसभा आज चांगलीच गाजली. आमदार दीपक केसरकर यांच्यासमोर विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील प्रश्नांचा अक्षरशः पाढाच वाचला.
यावेळी सावंतवाडीतील बहुचर्चित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. हॉस्पिटलच्या घोषणांना आणि दिल्या जाणाऱ्या तारखांना आता नागरिकही वैतागले असून, नेमके हॉस्पिटल कधी उभे राहणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, वेत्ये गावाचे आदर्श युवा सरपंच गुणाजी गावडे यांनी थेट आमदार दीपक केसरकर यांच्यासमोरच आक्रमक भूमिका घेतली. “मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आता तरी बाप्पा पावणार काय? अजून किती तारखा दिल्या जाणार?” असा खणखणीत सवाल त्यांनी उपस्थित केला.
गुणाजी गावडे यांच्या या थेट सवालामुळे सभागृहातील वातावरण काही काळ तापले. सावंतवाडीकरांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून, केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, याचे उत्तर मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावर उत्तर देताना माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संदर्भातील निर्णय न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले. “या संदर्भात कोर्टाचा निर्णय होईल. त्यानंतर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नक्की होणार,” असे आश्वासन त्यांनी दिले.
त्यामुळे आता कोर्टाच्या निर्णयाकडे सावंतवाडीकरांचे लक्ष लागले असून, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम कधी मिळणार? हा सवाल पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.



