सिंधुदुर्गनगरी : गेल्या तब्बल १५ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत समाजहितासाठी विविध उपक्रमांची अखंड मुहूर्तमेढ रोवणाऱ्या कोकण संस्थेच्या कार्याचा जिल्हास्तरावर गौरव झाला आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सामाजिक संस्थांना प्रदान करण्यात येणारा जिल्हा युवा पुरस्कार सन २०२४-२५ कोकण संस्थेला जाहीर करण्यात आला असून, स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात या पुरस्काराने संस्थेचा सन्मान करण्यात आला.
१५ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री मा. ना. श्री. नितेश नारायण राणे, जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई, सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आदी मान्यवरांच्या हस्ते कोकण संस्थेला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संस्थेच्या वतीने संस्थापक दयानंद कुबल तसेच संस्था सदस्य योगेश भोसले यांच्यासह कोकण संस्थेचे कार्यकर्ते प्रथमेश सावंत, तन्वी केसरकर, ऋचा पेडणेकर, वैधवी म्हाडगुत, गौरी आडेलकर, समिर शिर्के, स्वाती मांजरेकर, शशिकांत कासले, चेतन धरणे, वैष्णवी म्हाडगूत, निलेश खामकर आदी उपस्थित होते.
समाजसेवेच्या वाटेवर १५ वर्षांची अविरत वाटचाल
कोकण संस्थेने गेल्या १५ वर्षांत सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रासोबतच स्वच्छता मोहिमा, क्रीडा स्पर्धा, रक्तदान शिबिरे, पर्यावरण संवर्धन, युवक विकास आणि विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले आहेत. समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचत सकारात्मक परिवर्तन घडविण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संस्थेच्या कार्याला मिळालेली ही पुरस्काराची पावती म्हणजे केवळ सन्मान नसून, गेल्या दीड दशकापासून निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्याची मशाल तेवत ठेवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या योगदानाला मिळालेली मानाची सलामी असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव
कोकण संस्थेला जिल्हा युवा पुरस्कार मिळाल्याची बातमी समोर येताच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. युवकांना सामाजिक कार्याची प्रेरणा देत समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची उमेद निर्माण करणाऱ्या संस्थेच्या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा, युवकांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि विकासात्मक कार्याची प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय युवा पुरस्कार प्रदान केला जातो.
कोकण संस्थेच्या या सन्मानामुळे सिंधुदुर्गच्या सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, १५ वर्षांच्या सेवाव्रताला मिळालेली ही पुरस्काराची मोहोर संस्थेच्या पुढील सामाजिक वाटचालीला नवी ऊर्जा देणारी ठरली आहे.



