सावंतवाडी नगर परिषदेमार्फत देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा व गुणवंतांचा गुणगौरव!

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने बॅरिस्टर नाथ पै सभागृहामध्ये स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून गेल्या सहा वर्षांनंतर पुन्हा नव्याने व मोठ्या उत्साहाने शालेय विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवून शहरामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सावंतवाडी नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले मॅडम यांच्या हस्ते प्रिंटर प्रदान करून करण्यात आला.

या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेमध्ये सावंतवाडी शहरातील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेचे निकाल तीन गटांमध्ये जाहीर करण्यात आले.

पहिली ते चौथी गट :
प्रथम क्रमांक – सावंतवाडी एज्युकेशन प्राथमिक शाळा
द्वितीय क्रमांक – जि. प. शाळा नं. ६
तृतीय क्रमांक – जि. प. शाळा नं. ४
उत्तेजनार्थ – मिलाग्रीस मराठी

पाचवी ते सातवी गट :
प्रथम क्रमांक – मदर क्वीन हायस्कूल
द्वितीय क्रमांक – शाळा नं. ४
तृतीय क्रमांक – राणी पार्वतीदेवी हायस्कूल
उत्तेजनार्थ – कळसुळकर इंग्लिश स्कूल

आठवी ते दहावी गट :
प्रथम क्रमांक – कळसुळकर इंग्लिश स्कूल
द्वितीय क्रमांक – मिलाग्रीस हायस्कूल
तृतीय क्रमांक – मदर क्वीन हायस्कूल
उत्तेजनार्थ – राणी पार्वतीदेवी हायस्कूल

या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थितांना झाडांचे वाटप करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून त्यांचे संगोपन करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

तसेच दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये शहरातून प्रथम, द्वितीय तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना भरघोस शैक्षणिक शिष्यवृत्ती, चेक व शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. हा गुणगौरव महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, पर्यटन व उद्यान सभापती शर्वरी मडगावकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, उपसभापती सुनीता पेडणेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबोरे, नगरसेविका दुलारी रांगणेकर, नीलम नाईक, सुकन्या टोपले, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक व ॲड. सायली दुभाषी यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय भाषणामध्ये सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले मॅडम म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शिक्षण घेत असताना इतरही कलागुणांना वाव दिला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या देशाचे भवितव्य घडवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावला पाहिजे. सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी, या उद्देशाने देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सर्व जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांचा देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाचा उत्साह पाहून त्या भारावून गेल्या होत्या.

तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच १५ ऑगस्टच्या निमित्ताने त्यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रास्ताविकपर भाषणामध्ये महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर म्हणाल्या की, आम्ही यावर्षी सावंतवाडी शहरातील जास्तीत जास्त महिलांना त्यांच्या आवडीनुसार व्यवसायाभिमुख विविध प्रशिक्षणांचे आयोजन केले आहे. त्यात कुकिंग, केटरिंग, हॉटेलिंग, विविध स्नॅक्स बनवणे, जाम-जेली, लोणचे, पापड, मसाले, दुग्धजन्य पदार्थ तसेच फिशपासून नाविन्यपूर्ण पदार्थ बनविणे इत्यादी प्रशिक्षणांचा समावेश आहे.

तसेच फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण, फोर व्हीलर प्रशिक्षण, टू व्हीलर प्रशिक्षण, १८ ते ४५ वयोगटातील महिला व मुलींसाठी एमएस-सीआयटी प्रशिक्षण, एआय प्रशिक्षण व डिजिटल पत्रिका बनविणे तसेच कराटे प्रशिक्षण अशा विविध प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या महिला व मुलींनी लवकरात लवकर नगरपरिषदेकडे आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून शाळांना सॅनिटरी वेंडिंग मशीनचेही वाटप करण्यात येणार आहे. यापुढेही असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत, असे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमाला सावंतवाडी शहरातील सर्व प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग दर्शविला होता. देशभक्तीपर गीतांनी सभागृह दणाणून गेले होते. सावंतवाडी शहरातील नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने उपस्थिती दर्शविली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालकल्याण सभापती दिपाली दिलीप भालेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन नगरसेविका दुलारी रांगणेकर व नगरसेविका शर्वरी धारगळकर यांनी केले. आभार उपसभापती सुनीता पेडणेकर यांनी मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles