सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा १९९९ मध्ये पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर आता २८ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी नवनवीन प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. शिरोडा येथील ‘ताज’ प्रकल्प भविष्यात पर्यटनाला वैभव मिळवू देणार असल्याने यामुळे सर्वच क्षेत्रांत रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे जिल्ह्यातून चिपी (सिंधुदुर्ग) विमानतळावरून फ्लाय-९१ (Fly91) च्या माध्यमातून देशातील महत्वाचे पर्यटन स्थळं असलेल्या हैदराबाद , सह अन्य शहरांना जोडणाऱ्या थेट विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग, गोवा आणि हैदराबाद यांच्यातील पर्यटन व्यवहाराला मोठा ‘बुस्टर डोस’ मिळाला आहे. हे नुकतेच पर्यटन व्यावसायिक यांच्या पर्यटन संस्था सावंतवाडी यांनी विमानातून ग्रुप टूर आयोजित करून दाखवून दिले आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायणराव राणे यांच्या दूरदृष्टीतून आकारास आलेल्या या पर्यटन विकासाला अधिक गती देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे आणि आमदार प्रमोद जठार विशेष प्रयत्न करत आहेत. गोवा राज्याच्या धर्तीवर आराखडा तयार करून भविष्यात जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला अधिक चालना देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

पर्यटन व्यावसायिकांचा ४ दिवसीय अभ्यास दौरा नुकताच सह्याद्री कृषी पर्यटन संस्था सावंतवाडी यांनी हैदराबाद येथे आयोजित केला होता. यात हैदराबादमधील जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांचा अभ्यास करण्यासाठी आणि सिंधुदुर्गात त्या धर्तीवर पर्यटन विकास घडवून आणण्यासाठी सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी संस्था, सावंतवाडी यांच्या वतीने जिल्ह्यातील ३० पर्यटन व्यावसायिक व अभ्यासकांच्या शिष्टमंडळाचा ४ दिवसीय अभ्यास दौरा नुकताच यशस्वीपणे पार पडला.
ज्येष्ठ पर्यटन मार्गदर्शक श्री. महेश सामंत (भोगवे) आणि सह्याद्री कृषी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष रामानंद शिरोडकर व उपाध्यक्ष प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पर्यटन व्यावसायिक सौ.विभावरी संदीप सुकी आणि युक्ता प्रमोद सावंत यांनी या दौऱ्याचे यशस्वी नियोजन केले. या दौऱ्यात वेगुर्ला भोगवे येथील प्रसिध्द ‘दी लीला’चे मालक महेश सामंत, एस. डी. एस. ग्रीन हेवनच्या संचालिका संगीता देसाई, सुहास देसाई, सिंधुदुर्ग जिल्हा फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, उद्योजक रविकांत सावंत नंदकिशोर दळवी, चेतन सामंत, नेहा दळवी, राऊळ यांसह सावंतवाडी, कुडाळ व वेंगुर्ला भागातील ‘सिंधू रत्न’ योजनेतून कॉटेज व पर्यटन व्यवसाय सुरू करणाऱ्या लाभार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
४ दिवसांचे सुटसुटीत नियोजन करण्यात आले होते
पहिला दिवस: ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ला (Statue of Equality) भेट देऊन दौऱ्याची सुरुवात झाली. तेथील शेकडो मंदिरे, इतिहास आणि रात्रीचा लेझर/स्लाईड शो पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरला.
दुसरा दिवस: नेहरू झुलॉजिकल पार्क (Nehru Zoological Park) मध्ये ओपन गाडीतून सफारीचा आनंद घेतला. तसेच ऐतिहासिक चारमिनार, लुंबिनी पार्क आणि एन.टी.आर. गार्डन येथील पर्यटन व्यवस्थेची पाहणी केली.
तिसरा दिवस: जागतिक प्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीला (Ramoji Film City) भेट देऊन पडद्यामागची फिल्मी दुनिया आणि हजारो एकर परिसरातील भव्य सेट्सचा अनुभव घेतला. संध्याकाळी बिर्ला मंदिराचे दर्शन घेतले.
चौथा दिवस: प्रसिद्ध सालारजंग म्युझियममधील निजामकालीन दुर्मिळ वस्तू व शस्त्रास्त्रांची पाहणी, लाड बाजारात शॉपिंग आणि त्यानंतर चिपीसाठी परतीचा प्रवास झाला
लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि पर्यटनाचा नवा ट्रेंड
चिपी विमानतळावरून गोवा, म्हापसा व सावंतवाडी येथे जाण्यासाठी प्रशासनाने अवघ्या ३०० रुपये प्रति प्रवासी दराने वातानुकूलित (AC) शटल बस व कॅब सेवा उपलब्ध केली आहे. यामुळे हैदराबादवरून थेट गोव्यात न उतरता चिपी (सिंधुदुर्ग) येथे उतरून कॅब किंवा बसने गोव्याकडे जाण्याचा नवा ट्रेंड पर्यटकांमध्ये पाहायला मिळत आहे. या ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’मुळे सिंधुदुर्गातील स्थानिक पर्यटनालाही मोठा वाव मिळत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात
पायाभूत सुविधांचा विस्तार आवश्यक आहे यात विमानतळाकडे जाणारे रस्ते रुंदीकरण, पार्किंग व्यवस्था, अहोरात्र वीज पुरवठा आणि स्वच्छतेवर भर देणे.
तसेच सागरी महामार्ग वरून गोवा, मालवण आणि ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांचे व सागरी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करणे.
चिपी विमानसेवेचा विस्तार करणे गरजेचे असून सध्या मुंबई, पुणे, बंगळुरू आणि हैदराबाद सेवा सुरू असून देशातील इतर प्रमुख शहरांशी सिंधुदुर्ग जोडणे आवश्यक त्यामुळं अन्य शहरांना जोडणाऱ्या सेवेमुळे पर्यटनात वाढ होत राहणार आहे
यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन, मत्स्य विकास होण्यासाठी
पालकमंत्री ना. नितेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने ‘सिंधू रत्न’ योजनेअंतर्गत स्थानिकांना आर्थिक सहाय्य देऊन आधुनिक कॉटेज उभारणीस गती दिली जात आहे. या अभ्यास दौऱ्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना आदरातिथ्य (Hospitality) आणि सेवा दर्जा सुधारण्याचे मोलाचे धडे मिळाले असून, आगामी काळात ही विमान जोडणी सिंधुदुर्गाच्या आर्थिक व पर्यटन विकासाला नवी दिशा देईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यात भविष्यात अशा प्रकारे अभ्यास दौरे आवश्यक असून त्यातून नवनवीन उद्योजकांना पर्यटन व्यावसायिक यांना संधी उपलब्ध होणार आहे याला लक्ष देण्याची गरज आहे



