सावंतवाडी : शेतकऱ्यांच्या पिकांची अचूक, पारदर्शक आणि वेळेत नोंदणी व्हावी, यासाठी कलंबिस्त गावात पीकपाहणी नोंदणीच्या कामाला वेग आला आहे. पीकपाहणी सहाय्यकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पिकांची पाहणी करून नोंदणी करण्यात येत आहे.
या उपक्रमादरम्यान सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी तसेच पीकपाहणी सहाय्यक, कलंबिस्तचे पोलीस पाटील तसेच महसूल सेवक यांनी प्रत्यक्ष शेतात उपस्थित राहून पीकपाहणी नोंदणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याची अचूक नोंद घेण्यास मदत होत आहे.
पीकपाहणी नोंदणीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची अधिकृत नोंद उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे भविष्यातील विविध शासकीय योजना, पीकविमा तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीच्या नोंदीसाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरते.
दरम्यान, कलंबिस्त परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची पीकपाहणी नोंदणी वेळेत करून घ्यावी आणि नोंदणी प्रक्रियेस आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.



