शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? ; आज सुप्रीम कोर्टात निर्णायक सुनावणी! ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, शिंदे गटाकडून आज अंतिम युक्तिवादाची तयारी.

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर आज, बुधवार २ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होत आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिले आहे. या प्रकरणातील अंतिम युक्तिवाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. आजच्या सुनावणीत शिंदे गटाच्या वतीने त्यांचे वकील सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडणार आहेत. त्यामुळे दिल्लीतील राजकीय हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

‘खरी शिवसेना कोणाची?’ आणि ‘धनुष्यबाणावर अंतिम हक्क कुणाचा?’ या दोन प्रमुख प्रश्नांभोवती ही कायदेशीर लढाई केंद्रित आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार सध्या शिंदे गटाकडे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आहे; मात्र या निर्णयाविरोधातील ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

यापूर्वीच्या सुनावण्यांमध्ये ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला आहे. विधिमंडळ पक्षातील फूट म्हणजे मूळ राजकीय पक्षातील फूट नव्हे, असा प्रमुख मुद्दा ठाकरे गटाने मांडला होता. आता शिंदे गटाकडून या मुद्द्यांसह निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ कोणते कायदेशीर युक्तिवाद केले जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणीही ठाकरे गटाकडून करण्यात आल्याने आजच्या सुनावणीला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. या मागणीवर शिंदे गटाची भूमिका काय असणार, तसेच सर्वोच्च न्यायालय या संपूर्ण प्रकरणाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहते, याची उत्सुकता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे.

आजच्या सुनावणीत शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू होत असताना, शिवसेनेच्या पक्षनाव आणि धनुष्यबाणाच्या भवितव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles