दोडामार्ग: शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाची ठरणारी ई-पिक नोंदणीच सध्या तांत्रिक अडथळ्यांच्या विळख्यात सापडली आहे. साटेली-भेडशी येथील शेतकऱ्यांना DCS ॲपवर ई-पिक नोंदणी करताना अनोख्या तांत्रिक समस्येला सामोरे जावे लागत असून, साटेली-भेडशी गावाऐवजी नकाशावर चक्क ‘सासोली’ गाव दिसत असल्याने शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया खोळंबली आहे.
ई-पिक नोंदणीसाठी DCS ॲपवर साटेली-भेडशी येथील संबंधित सर्वे क्रमांक टाकल्यानंतर पुढील प्रक्रिया करताना नकाशावर गावाचे चुकीचे नाव प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आपल्या शेतजमिनीची अचूक माहिती नोंदवायची कशी?, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. तांत्रिक यंत्रणेतील या घोळामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, ई-पिक नोंदणीची प्रक्रिया अक्षरशः ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
‘एका क्लिक’च्या नोंदणीला तांत्रिक अडथळ्यांची बेडी!
ई-पिक नोंदणी ही केवळ कागदोपत्री प्रक्रिया नसून पीकविमा, कृषी अनुदान, विविध शासकीय योजना आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कृषीविषयक लाभांसाठी अत्यंत महत्त्वाची नोंद मानली जाते. त्यामुळे वेळेत ई-पिक नोंदणी न झाल्यास पात्र शेतकरी भविष्यात विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या शेतात पीक उभे; मात्र ॲपच्या नकाशावर गावच बदलले! या विचित्र तांत्रिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रक्रिया सुलभ करण्याचा उद्देश असताना, अशा तांत्रिक त्रुटींमुळे शेतकऱ्यांनाच अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
महसूल-कृषी विभागाने तातडीने दखल घेण्याची मागणी –
या गंभीर तांत्रिक समस्येची संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन DCS ॲपवरील गावाच्या नकाशातील त्रुटी दूर करावी, साटेली-भेडशी गावाची अचूक नोंद उपलब्ध करून द्यावी आणि रखडलेली ई-पिक नोंदणी सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
लोकप्रतिनिधींसह महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तांत्रिक अडथळ्यांची ही ‘अदृश्य भिंत’ तातडीने दूर करावी, अशी अपेक्षा साटेली-भेडशीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.



