‘१७ लाखांचा घोटाळा अन् सत्ताधाऱ्यांची अंतर्गत गटबाजी!’ ; सभापतींचे नाव घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडूनच ‘टीप’; नगरसेवक देवा टेमकरांचा खळबळजनक गौप्यस्फोट!

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत गटबाजीचा फटका शहराच्या विकासकामांना बसत असून, याच राजकारणातून नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील तब्बल १७ लाख रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक देवा टेमकर यांनी केला. विशेष म्हणजे, पाणीपुरवठा सभापतींचे नाव या प्रकरणात घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडूनच ‘टीप’ देण्यात आली, असा खळबळजनक गौप्यस्फोटही टेमकर यांनी केला.

नगरसेवक टेमकर यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप करताना, “समितीचा सदस्य म्हणून आम्ही हा प्रकार होण्यापूर्वीच रोखला,” असा दावा केला. या प्रकरणात चौकशीत जोडारी दोषी आढळल्याचे सांगतानाच, केवळ एका व्यक्तीपुरती चौकशी मर्यादित न ठेवता या संपूर्ण प्रकरणामागे नेमके कोण आहे, कोणाच्या दबावातून हा प्रकार घडला आणि त्यात आणखी कोण-कोण सहभागी आहेत, याचा सखोल तपास झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

टेमकर म्हणाले, “नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांमध्ये दोन गट पडले असून त्याचा थेट परिणाम शहराच्या विकासावर होत आहे. पाणीपुरवठा विभागातील १७ लाखांच्या प्रकरणात आम्ही समिती सदस्य म्हणून आक्षेप घेतल्यामुळे हा प्रकार पुढे जाण्यापासून रोखता आला.” या प्रकरणातील चौकशीत जोडारी दोषी आढळला असल्याचे सांगत त्यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि या प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असलेल्या सर्वांची चौकशी करण्याची मागणी केली.

“या प्रकरणामागे कोणाचा हात आहे?” असा थेट सवाल उपस्थित करत टेमकर यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. नगराध्यक्ष आणि सभापतींकडे यापूर्वीच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, बिल काढण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांकडून दबाव आणला जात होता, असा गंभीर आरोपही टेमकर यांनी केला. मात्र, समिती सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंतर संबंधित बिल अदा करण्यात आले नसल्याचा दावा त्यांनी केला.

या प्रकरणाला आणखी वेगळे वळण देताना टेमकर यांनी “सभापतींचे नाव या प्रकरणात घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडूनच टीप देण्यात आली,” असा थेट आरोप केला. त्यामुळे नगरपरिषदेतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

१७ लाखांच्या या प्रकरणाची केवळ कागदोपत्री चौकशी न करता संपूर्ण आर्थिक व्यवहार, बिल प्रक्रिया, संबंधित अधिकारी-कर्मचारी तसेच निर्णय प्रक्रियेमागील व्यक्तींची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी टेमकर यांनी केली.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख शैलेश गवंडळकर उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles