सावंतवाडी : शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने भरीव योगदान देत विविध शैक्षणिक उपक्रमांना नवी दिशा देणारे, मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य तथा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ व श्रमिक विद्यार्थी ज्ञान सेवा संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांची संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूरच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी अभिनंदनीय निवड झाली आहे. त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कार्याची दखल घेत झालेल्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

शैक्षणिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या युवराज लखमसावंत भोंसले यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदाची जबाबदारीही प्रभावीपणे सांभाळली आहे. त्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडीच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुन्या आणि यूजी ते पीजीपर्यंत विविध अभ्यासक्रम राबविणाऱ्या, मुंबई विद्यापीठाचा ‘बेस्ट कॉलेज’ तसेच नॅक ‘ए’ श्रेणी प्राप्त असलेल्या आणि जिल्ह्यातील पहिले स्वायत्त महाविद्यालय म्हणून लौकिक मिळविलेल्या श्री पंचम खेमराज महाविद्यालयाला लीड कॉलेजचा दर्जा मिळवून देण्याच्या आणि बदलत्या शैक्षणिक प्रवाहाशी महाविद्यालयाला जोडून ठेवण्याच्या प्रयत्नांत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
विशेषतः कला, वाणिज्य व विज्ञान शाखांसोबतच आयटी, कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारखे आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या बदलत्या प्रवाहानुसार महाविद्यालयाला अद्ययावत ठेवण्यासाठी त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय ठरले आहेत.
या अभिनंदनीय निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी युवराज लखमसावंत भोंसले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री. जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत, संस्थेचे संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, श्री पंचम खेमराज लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अश्विनी लेले, मदर क्वीन्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा साळगावकर, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव, दूरदृष्टी आणि आधुनिक शिक्षणव्यवस्थेची जाण यामुळे युवराज लखमसावंत भोंसले यांची ही निवड सिंधुदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.



