सावंतवाडी : सोनुर्ली–होळीचा खुर्द परिसरात मुंबई–गोवा रेल्वे मार्गालगत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. सदर घटना ही शुक्रवारी दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनुर्ली होळीचा खुर्द येथे मुंबई–गोवा रेल्वे ट्रॅकच्या उजव्या बाजूच्या वहाळीत एक अनोळखी इसम मृतावस्थेत आढळून आला. या इसमाचे टी-शर्ट झाडीला अडकलेले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रेल्वेतून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेची खबर मंगेश राजाराम केनी (वय २२, रा. रोणापाल, आरोसकर टेंब, ता. सावंतवाडी) यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक ६७/२०२६, BNSS कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली. सदर नोंद दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ३.४७ वाजता करण्यात आली.
घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक श्री. लोहकरे, हेड कॉन्स्टेबल श्री. पाटील व पोलीस कॉन्स्टेबल श्री. खुराडे यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार श्री. धोत्रे हे करीत आहेत.
मयताची ओळख अद्याप पटलेली नसून, मृत व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



