कोंडुरेच्या मोबाईल कनेक्टिव्हिटीचा ‘टॉवर’ प्रश्न अखेर मार्गी! ; ग्रामपंचायत मळेवाड-कोंडुरेचा बीएसएनएलसोबत करार पूर्ण, प्रत्यक्ष टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात.

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड-कोंडुरेच्या कार्यक्षेत्रातील कोंडुरे गावाच्या मोबाईल कनेक्टिव्हिटीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ग्रामपंचायत मळेवाड-कोंडुरेने बीएसएनएलसोबतचा आवश्यक करार पूर्ण केला असून कोंडुरे येथे नव्याने बीएसएनएल मोबाईल टॉवर उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच कोंडुरे परिसरातील नागरिकांना मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध होणार आहे.

कोंडुरे हे स्वतंत्र महसुली गाव असून, आजवर या ठिकाणी मोबाईल टॉवरची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांसह मोबाईल ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. मोबाईल नेटवर्कअभावी फोन कॉल, इंटरनेट तसेच ऑनलाइन व्यवहार आणि विविध डिजिटल सेवांवरही परिणाम होत होता.

गावागावांत बीएसएनएलची मोबाईल सेवा पोहोचविण्याच्या प्रयत्नांतर्गत खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून कोंडुरे येथे बीएसएनएल मोबाईल टॉवर मंजूर करण्यात आला होता. मात्र, टॉवर उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होत नसल्याने प्रत्यक्ष कामाला विलंब होत होता.

ही अडचण लक्षात घेऊन ग्रामपंचायत मळेवाड-कोंडुरेने पुढाकार घेत ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा बीएसएनएल मोबाईल टॉवरसाठी उपलब्ध करून देण्याचा एकमुखी ठराव मासिक सभेत मंजूर केला. त्यानंतर सरपंच सौ. मिलन पार्सेकर आणि उपसरपंच हेमंत मराठे यांनी पुढाकार घेत बीएसएनएलसोबत आवश्यक कराराची प्रक्रिया पूर्ण केली.

करार पूर्ण झाल्यानंतर आता कोंडुरे येथे मोबाईल टॉवर उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नेटवर्कच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या कोंडुरे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या कामासाठी कोंडुरे ग्रामस्थांनीही सकारात्मक सहकार्य केले असून, टॉवर उभारणीचे काम सुरू झाल्याने परिसरातील मोबाईल ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे. लवकरच बीएसएनएलची मोबाईल सेवा कार्यान्वित झाल्यानंतर कोंडुरे गाव डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या नकाशावर अधिक सक्षमपणे जोडले जाणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles