दोडामार्ग : जिद्द, चिकाटी, सांघिक एकजूट आणि विजयाची दुर्दम्य इच्छाशक्ती यांच्या जोरावर क्रीडांगणावर आपल्या कौशल्याची मोहोर उमटवत कोलझर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व्हॉलीबॉल स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. न्यू इंग्लिश स्कूल, भेडशी येथे संपन्न झालेल्या दोडामार्ग तालुकास्तरीय शालेय सांघिक क्रीडा स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघाने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड होण्याचा मान पटकावला. या यशामुळे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल परंपरेला आणखी झळाळी प्राप्त झाली आहे.
मैदानावरील चुरशीच्या लढतींमध्ये खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, चपळता, अचूक खेळ आणि एकमेकांना साथ देण्याची वृत्ती ही त्यांच्या यशाची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली. सांघिक खेळातील शिस्त, समन्वय आणि कठोर सरावाच्या बळावर विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे. त्यांच्या या यशामुळे प्रशालेत आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडाशिक्षक जयसिंगराव वाघमोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी सराव, शिस्त आणि संघभावना यांची सांगड घालत आपल्या खेळात सातत्यपूर्ण सुधारणा केली. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्यानेच हे यश साकार झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईच्या अध्यक्षा श्रीमती कल्पनाताई तोरसकर, कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, सचिव संतोष सावंत, खजिनदार वैभव नाईक, कार्यकारिणी सदस्य तथा समन्वय समिती सचिव श्रीमती रश्मीताई तोरसकर, सहसचिव श्री. नंदकुमार नाईक, तसेच सर्व शालेय समिती सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षक-पालक संघ यांच्या वतीने यशस्वी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
जिल्हास्तरीय स्पर्धेतही कोलझर हायस्कूलचे खेळाडू आपल्या उत्कृष्ट खेळाची चमक दाखवून प्रशालेचा नावलौकिक उंचावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील क्रीडावाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
तालुकास्तरावर यशाची पताका फडकवणाऱ्या या युवा खेळाडूंनी आता जिल्हास्तरावरही विजयाची भरारी घ्यावी आणि आपल्या गुणवत्तेच्या बळावर यशाची नवी शिखरे पादाक्रांत करावीत, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली आहे.



