आरपीडी प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा उद्या गौरवशाली सोहळा!

सावंतवाडी : शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव, विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आणि उज्ज्वल भविष्याची प्रेरणा देण्यासाठी सावंतवाडी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी ‘गुणगौरव सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्तापूर्ण यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे.  यावेळी संस्था अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्यासह सर्व संस्था पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या यशाला नवी झळाळी देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला सन्मानाची जोड देतानाच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा निर्माण करणारा हा सोहळा ठरणार आहे.

चौथी शिष्यवृत्ती परीक्षा, पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, सातवी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा तसेच ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत गुणवत्तापूर्ण यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान केला जाणार आहे. विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांच्या यशातून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या जिद्द, चिकाटी व मेहनतीची प्रचिती येत आहे.

विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव, नव्या स्वप्नांना बळ! या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला पालक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

हा गुणगौरव सोहळा सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या नवरंग कलामंचावर पार पडणार आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद साजरा करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणेचे नवे दालन खुले करणारा हा सोहळा ठरणार आहे.

Previous article
Next article

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles