– ग्रामस्थांच्या हरकतींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप.
– संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी
सावंतवाडी : विकासाच्या नावाखाली जुन्याच कामांना नवा मुलामा देऊन जनतेच्या डोळ्यांत धूळफेक केली जात असेल, तर अशा प्रकारांना जाब विचारलाच पाहिजे, अशा आक्रमक शब्दांत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ यांनी आरोंदा येथील जलजीवन मिशनअंतर्गत आयोजित जलार्पण कार्यक्रमावरून गंभीर प्रश्न उपस्थित केले. जुन्या विहिरीला रंगरंगोटी करून नवीन विहीर असल्याचे भासविण्यात आले आणि त्यावर जलार्पणाचा सोहळा पार पडला, असा आरोप करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
सावंतवाडी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख राजू शेटकर, अशोक धुरी, मच्छीमार नेते गोकुळदास मोटे, आरोंदाचे माजी उपसरपंच आबा केरकर आदी उपस्थित होते.
२००९ मधील विहिरीवर जलार्पण; मग नवीन विहीर नेमकी कुठे?
आरोंदा येथे २ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद जलजीवन योजनेंतर्गत जलार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमाच्या आयोजनावरून आता वादाची ठिणगी पडली आहे. ग्रामस्थांच्या अनेक हरकती असतानाही तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता हा कार्यक्रम राबविण्यात आल्याचा आरोप राऊळ यांनी केला.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती उपस्थित होते. मात्र, आरोंद्याचे माजी उपसरपंच आबा केरकर यांच्यासह संजीव पेडणेकर, बबन नाईक आणि सिद्धेश नाईक यांना निमंत्रित करण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणातील सर्वांत गंभीर मुद्दा म्हणजे जलार्पण करण्यात आलेली विहीर नवीन नसून ती २००९ मध्येच पूर्ण झालेली असल्याचा राऊळ यांचा दावा आहे. यशवंत ग्राम समृद्धी योजनेंतर्गत जाधववाडीसाठी नऊ लाख रुपयांच्या निधीतून ही विहीर बांधण्यात आली होती. त्याच जुन्या विहिरीला रंगरंगोटी करून नवीन काम असल्याप्रमाणे सादर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
“नवीन विहिरीसाठी निधी खर्च झाला असेल, तर ती विहीर नेमकी कुठे आहे? जुन्याच विहिरीवर जलार्पणाचा कार्यक्रम करून विकासकामांचा देखावा कशासाठी?” असा थेट सवाल उपस्थित करत राऊळ यांनी या प्रकरणात दहा ते पंधरा लाख रुपयांचा कथित अपहार झाल्याचा संशय व्यक्त केला. या आरोपांची अधिकृत चौकशी होऊन वस्तुस्थिती जनतेसमोर यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन; चौकशीची मागणी –
आरोंदा येथील या कथित प्रकाराबाबत गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आल्याचे रूपेश राऊळ यांनी सांगितले. केवळ उद्घाटन आणि जलार्पणाच्या सोहळ्यांनी विकास सिद्ध होत नाही; तर जनतेच्या पैशातून उभारलेल्या कामांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि प्रत्यक्ष अस्तित्व यांचा हिशेबही जनतेला मिळाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आरोंदा ग्रामपंचायतीपासून सावंतवाडी नगरपरिषदेपर्यंत कारभारात अनियमिततेचे आरोप समोर येत असल्याचे सांगत, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामकाजाची सखोल तपासणी होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा सभापतीच्या राजीनाम्याचा दाखला –
सावंतवाडी नगरपरिषदेतील पाणीपुरवठा सभापतीला राजीनामा द्यावा लागल्याचा उल्लेख करत राऊळ म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या पक्षाच्या सभापतीलाही राजीनामा द्यावा लागत असेल, तर स्थानिक प्रशासनातील कारभाराबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. आरोंदा ग्रामपंचायतीतील कथित अनियमिततांच्या प्रकरणात केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर न थांबता संबंधित अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित केली पाहिजे. दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनासह नियमानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
‘विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशांचा हिशेब द्या!!’
पाणी ही जनतेची मूलभूत गरज आहे. अशा महत्त्वाच्या योजनेच्या अंमलबजावणीतच पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर सामान्य नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे, असा सवाल या प्रकरणामुळे उपस्थित होत आहे. जुन्या विहिरीचे नूतनीकरण झाले की नवीन विहीर बांधण्यात आली, निधी नेमका कुठे आणि कसा खर्च झाला, तसेच संबंधित कामाची तांत्रिक तपासणी झाली का, या प्रश्नांची अधिकृत उत्तरे मिळणे आवश्यक आहे.
आरोंद्यातील विहिरीच्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून निधीच्या विनियोगाचा हिशेब जनतेसमोर मांडावा आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रूपेश राऊळ यांनी केली. आता संबंधित प्रशासन या आरोपांची दखल घेऊन काय भूमिका घेते, याकडे आरोंद्यासह संपूर्ण सावंतवाडी तालुक्याचे लक्ष लागले आहे.



