सावंतवाडी : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत, सर्वसामान्यांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक बांधिलकीतून सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्रीदेवी वटसावित्री मंडळ आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. १६ ऑक्टोबर) हे शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख आणि विद्यमान नगरसेवक संजू परब व विद्यमान नगरसेविका तथा बचत गटाच्या अध्यक्षा सीमा नाईक यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे जनरल सर्जन डॉ. अकबर, आपला दवाखान्याचे डॉ. हर्ष सागावकर आणि नगरसेविका सीमा नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

आरोग्य तपासणीबाबत जनजागृतीवर भर –
यावेळी नगरसेविका सीमा नाईक यांनी नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहून नियमित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले. आपला दवाखान्याच्या माध्यमातून रक्त तपासणी आणि औषधोपचार मोफत उपलब्ध होत असल्याने नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे संचालक तथा माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांनी महाविद्यालयात गेल्या चार महिन्यांत अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती झाल्याची माहिती दिली. शहरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. अकबर यांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगांपासून बचावासाठी उपलब्ध असलेल्या प्रतिबंधात्मक लसींचे महत्त्व स्पष्ट केले. योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
नगरसेविका सुकन्या टोपले यांनी शहरातील विविध भागांत आरोग्य शिबिरे आयोजित करून महिला आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय आरोग्य सुविधा पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली.
जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पात्र लाभार्थ्यांना या योजनांमधून उपचार व शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत मिळू शकते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह आरोग्य योजनेचे कार्ड काढून घ्यावे, असे त्यांनी आवाहन केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी अद्याप आयुष्मान भारत कार्ड काढलेले नसल्याने त्यांना उपलब्ध आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यात अडचणी येऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. रेशनकार्ड, आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांकाच्या साहाय्याने संबंधित शासकीय रुग्णालय किंवा अधिकृत सेवा केंद्रात कार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण करता येते, अशी माहितीही त्यांनी दिली.
वयाची ४० वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोलेस्टेरॉलसह आवश्यक आरोग्य तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित कराव्यात. कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यास हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावेत, असे मार्गदर्शन मसुरकर यांनी केले.
आपला दवाखान्यात मोफत तपासणी व औषधोपचार
डॉ. हर्ष सागावकर यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून लिपिड प्रोफाइल, थायरॉईडसह विविध रक्त तपासण्या आणि औषधोपचार मोफत उपलब्ध असल्याचे सांगितले. सावंतवाडीतील सालईवाडा येथे चर्चशेजारी असलेल्या आपला दवाखान्यात सायंकाळी ४ ते ८.३० या वेळेत नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
मान्यवरांची उपस्थिती
या शिबिराला नगरसेविका सुकन्या टोपले, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, नगरसेविका शर्वरी धारगळकर, मराठा महिला समाजाच्या अध्यक्षा संजना संजू परब, जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, निवेदिका सरोज दाभोलकर, जागृती बेकनाळकर, परिचारिका तृप्ती अंधारी, लॅब टेक्निशियन गायत्री वारंग, आरोग्य सेवक दत्तात्रय माळी, परिचर गंगा सुतार, यशवंत परब, नीलम कुमठेकर, शुभदा तिरोडकर, मांजरेकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
शिबिरात नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेत मोफत औषधोपचारांचा लाभ घेतला. शेवटी नगरसेविका सीमा नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले. आरोग्यसेवा सर्वसामान्यांच्या दारी पोहोचविण्याच्या या उपक्रमामुळे खासकीलवाड्यात आरोग्यविषयक जनजागृतीला चालना मिळाली.



