सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील दामिनी किरण पालव खून प्रकरणात आरोपी साहिल विश्राम धुरी याला २४ ऑक्टोबरपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज दुपारी आरोपीला कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने ही कोठडी सुनावली. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अंतर्गत खुनाचा गुन्हा आरोपीवर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, खुनामागील नेमके कारण काय, घटनेपूर्वी काय घडले आणि या गुन्ह्याशी संबंधित इतर बाबी काय आहेत, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. आरोपीला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तथा तपासी अधिकारी विकास बडवे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. आरोपीकडून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असून, तपासातून या प्रकरणातील आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दामिनी पालव हिच्या खुनामागील नेमके कारण आणि या गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रम पोलीस तपासातून कधी स्पष्ट होतो, याकडे आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.



