‘आम्ही हिंदू, आमच्यात ‘घटस्फोट’ हा शब्दच अस्तित्वात नाही..!’ ; विवाहबाह्य संबंधांच्या चर्चांवर गोविंदाचं स्पष्ट मत.

मुंबई : बॉलिवूडचा ‘हिरो नंबर 1’ अभिनेता म्हणजे, गोविंदा बऱ्याच काळापासून गोविंदा त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा, त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी सुनीता आहुजानं कित्येकदा जाहीरपणे बोलताना गोविंदावर विवाहबाह्य संबंधांचे आरोप केलेत. तेव्हापासूनच सोशल मीडियावर गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. त्यासोबतच पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांच्या आरोपांमुळे त्याचं नाव त्याची को-स्टार अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्याशी जोडलं जातंय. येत्या काही दिवसांतच गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार यांचा ‘रूपा’ सिनेमा येतोय. त्याच्या पार्श्वभूमीवरच अनेकदा गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार एकत्र दिसतात. सिनेमाच्या प्रमोशनसाठीही गोविंदा ‘लालबागचा राजा’च्या चरणी नतमस्तक होण्यासाठी कोमल राणी स्वर्णकारसोबत गेला आणि पत्नी सुनीता अहुजा मात्र एकटीच गेल्याचं पाहायला मिळालेलं. तेव्हापासून गोविंदाचा घटस्फोट आणि अभिनेत्रीसोबत अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे.

याच पार्श्वभूमीवर गोविंदानं एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील कलहावर भाष्य केलंय. तसेच, घटस्फोटावरही त्यानं थेट भाष्य केलंय.

गोविंदानं विवाहबाह्य संबंधांचे आरोप, सुनीता आहुजा यांचा वेगळं राहण्याचा निर्णय आणि घटस्फोटाच्या चर्चांवर आपलं मौन सोडलं आहे. गोविंदानं ‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं की, सुनीता जे काही करतेय, ते त्यांच्या मुलांच्या भल्यासाठीच करतेय. अभिनेत्यानं सुनीताला आपलं ‘पहिलं प्रेम’ असं संबोधलं आणि म्हटलं की, प्रेमासारख्या गोष्टीशी खेळणं योग्य नाही. गोविंदानं असा आरोप केलाय की, त्यांच्या संसारात फूट पडण्यामागे तिसऱ्या व्यक्तीचा हात आहे, मात्र त्यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही.

गोविंदाला कुटुंबीयांकडूनच बदनामी का सहन करावी लागतेय? 

मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना गोविंदा म्हणाला की, “वेळ… ती कधीही असा पडदा उघडत नाही, ज्यामुळे लोकांना संपूर्ण जगासमोर अपमानित व्हावं लागेल. सत्य हे आहे की, 8-9 वर्षांपूर्वी मी एका व्यक्तीला सांगितलं होतं की, असं काहीतरी घडेल की, मला अशा टप्प्यातून जावं लागेल आणि आपल्या सर्वांवर त्याचा परिणाम होईल… जर कोणी हे लिहून ठेवलं असेल, तर ते घडणारच… ज्यानं हे लिहिलंय, तो काही सामान्य माणूस नाही…”

सुनिताच्या डोळ्यांवर एक पडदा पडलाय : गोविंदा 

अभिनेता गोविंदा म्हणाला की, “बदनामी माझ्या नावाचाच एक भाग राहिली आहे. माझ्या नावामध्येच तसा अर्थ दडलाय. काहींनी माझ्यावर प्रेम केलं, तर काहींनी, माझ्या नावाशी जोडून, असा अंदाज वर्तवलाय की, मी त्यांची फसवणूक करिन. आता आपण जे पाहतोय, तो अशा लोकांचा विरोध आहे, जे कालांतरानं शक्तिशाली बनलेत…” यावेळी अभिनेत्यानं आपल्या पत्नीला ‘भाग्यवान’ आणि ‘लक्ष्मी’ असं संबोधलंय. त्यानं कृतज्ञता व्यक्त केलीय की, तिच्यामुळेच तो आज ज्या स्थानावर आहे, तिथे पोहोचू शकला आहे. गोविंदानं असा दावा केलाय की, तिच्या डोळ्यांवर एक पडदा पडलाय, मात्र, हा पडदा कोणाच्या प्रभावाखाली पडलाय किंवा तो कोणाबद्दल बोलतोय, याचं नाव तो उघड करू शकत नाही.

गोविंदा ट्रोलिंगवर काय म्हणाला? 

गोविंदानं ट्रोलिंगच्या विषयावरही भाष्य केलंय. तो म्हणाला, “जे लोक आजच्या काळात स्वतःच्या पालकांचा आदर करत नाहीत आणि पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरतात, त्यांच्याकडे मी लक्ष का द्यावं? मला वाटतंय की, अशा लोकांची दखल घेणं म्हणजे स्वतःचीच बदनामी करून घेणं होय. चिखलात कमळ उमलतं, आणि जर त्यामुळे मला ‘चिखल’ म्हटलं जात असेल, तर तसं असू द्या. सोशल मीडियाचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही…”

सुनिता आणि गोविंदा यांच्यातील संबंधांत तणाव निर्माण होण्याचं कारण काय?

मुलाखती दरम्यान, जेव्हा त्याला त्यांच्या नात्यातील तणावाच्या कारणाबद्दल विचारलं गेलं, तेव्हा गोविंदानं स्पष्ट केलं की, “ती काही बंधनांमध्ये अडकलेली आहे, सामाजिक अपेक्षा, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्यांशी संबंधित वचनबद्धता. स्त्रियांचं मन अशा बंधनांत सहज अडकू शकतं. ती जे काही करतेय, ते मुलांच्या भल्यासाठीच करतेय. मी नेहमीच स्त्रियांचा सल्ला घेत आलोय, मग तिचा सल्ला का घेणार नाही? ती जे काही करतोय, ते योग्यच आहे… मुलांच्या कल्याणासाठीच ती हे करतेय…”

सुनीता आहुजाच्या घटस्फोटाच्या निर्णयावर गोविंदा काय म्हणाला? 

याव्यतिरिक्त, जेव्हा सुनीता आहुजानं घटस्फोटासाठी अर्ज केल्याबद्दल विचारलं गेलं, तेव्हा अभिनेत्यानं म्हटलं की, “तिनं तो निर्णय घेतला… आणि तिला तो घ्यावाच लागला… कसा नाही घेणार?” जेव्हा गोविंदाला विचारलं गेलं की, “तिनं हा निर्णय भीतीपोटी घेतला की प्रेमापोटी?” तेव्हा गोविंदा म्हणाले की, “नाही, नाही… आम्ही हिंदू आहोत आणि आमच्या परंपरेत ‘घटस्फोट’ हा शब्दच अस्तित्वात नाही. आमच्या व्यवस्थेत सर्व आवश्यक तरतूदी आधीच समाविष्ट आहेत…” सुनीता यांना समजावण्याबाबत विचारलं असता, ते पुढे म्हणाले की, “मी जसा आहे तसाच आहे. माझा असा विश्वास आहे की, जर तुम्ही स्वतःच्या भूमिकेपासून विचलित झालात, तर तुम्ही स्वतःच्याच ताकदीवर प्रश्नचिन्ह उभे करता. भविष्यात मला या विषयावर पुन्हा प्रश्न विचारले जावेत, असं मला वाटत नाही.”

ADVT –

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles