कौशल्याच्या पंखांनी महिला सक्षमीकरणाला नवी भरारी! ; सावंतवाडी नगरपालिकेच्या कौशल्यविकास प्रशिक्षणाला २०० हून अधिक महिला व तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद! ; नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत भोंसले यांची प्रशिक्षणस्थळी भेट!

सावंतवाडी : महिलांच्या हातांना कौशल्याची ताकद, स्वप्नांना आत्मविश्वासाचे बळ आणि स्वावलंबनाच्या वाटेला प्रगतीची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने सावंतवाडी नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने विविध कौशल्यविकास प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना केवळ प्रशिक्षण नव्हे, तर स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाला सावंतवाडी शहरातील २०० हून अधिक महिला व तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आशादायी पाऊल टाकले आहे.

महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील कौशल्यांना व्यावसायिक स्वरूप प्राप्त व्हावे आणि आर्थिक स्वावलंबनाच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक स्थान अधिक बळकट व्हावे, या हेतूने या प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फोर व्हीलर व टू व्हीलर ड्रायव्हिंग, अ‍ॅडव्हान्स फॅशन डिझायनिंग, कॅटरिंग यांसारख्या विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे. पारंपरिक चौकटीपलीकडे जाऊन नव्या संधींचा वेध घेणाऱ्या महिला व तरुणींसाठी हे प्रशिक्षण आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

या प्रशिक्षण शिबिराला सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा लखम सावंत भोंसले यांनी विशेष भेट देत प्रशिक्षणार्थी महिलांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि भविष्यातील संकल्प जाणून घेत त्यांनी महिलांचे मनोबल वाढविले. कौशल्य आत्मसात करून स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा, नव्या संधींचे सोने करावे आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करावी, असा सकारात्मक संदेश त्यांच्या संवादातून मिळाला.

महिला सक्षमीकरणाला केवळ घोषणांची नव्हे, तर कृतीची जोड!

महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा लखम सावंत भोंसले या सक्रियपणे कार्यरत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी शहरात महिला व मुलींसाठी विविध कल्याणकारी आणि कौशल्यवर्धक उपक्रम राबविण्यावर भर दिला जात आहे. महिलांच्या हातात कौशल्य आले, तर रोजगाराच्या संधी निर्माण होतात; रोजगारातून आर्थिक स्वातंत्र्य मिळते आणि आर्थिक स्वातंत्र्यातून आत्मविश्वासपूर्ण जीवनाची पायाभरणी होते, हीच या उपक्रमामागील व्यापक भूमिका आहे.

यावेळी महिला व बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर उपस्थित होत्या. महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे नगराध्यक्षा सौ. श्रद्धा लखम सावंत भोंसले यांनी कौतुक केले. महिलांच्या गरजा ओळखून त्यांना उपयुक्त प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या समितीच्या प्रयत्नांना त्यांनी दाद दिली.

महिलांच्या कर्तृत्वाला संधी, स्वप्नांना दिशा आणि आत्मनिर्भरतेला बळ देणारा हा उपक्रम सावंतवाडीच्या महिला सक्षमीकरणाच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. महिला व बालकल्याण समितीने घेतलेल्या या पुढाकारामुळे शहरातील महिलावर्गात आनंदाचे वातावरण असून, अशा उपक्रमांमधून महिलांच्या प्रगतीला नवे क्षितिज खुले होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles