मालवण : दिवाळी म्हणजे केवळ पणत्या, आकाशकंदील आणि फराळाची रेलचेल नव्हे, तर ज्ञानाचा प्रकाश आणि संस्कारांची शिदोरी पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचाही मंगलमय उत्सव! याच विचाराला कृतीची जोड देत अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवण यांच्या वतीने नामदेव शंकर कावले इंग्लिश मीडियम स्कूल, आचरे येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही अनोखा ‘दिवाळी अक्षरदान’ उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत इयत्ता आठवी व नववीतील विद्यार्थ्यांना ‘साधना’ साप्ताहिकाचे बालकुमार दिवाळी अंक दिवाळीची अनमोल अक्षरभेट म्हणून मोफत वितरित करण्यात आले. पुस्तकांच्या रूपाने ज्ञानाचा खजिना आणि वाचनाचा आनंद बालहातांत सोपविणाऱ्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांची दिवाळी अधिक समृद्ध केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कथामालेचे प्रमुख सल्लागार सुरेश गावकर होते, तर मार्गदर्शक म्हणून कथामालेच्या कार्यवाह सुगंधा केदार गुरव उपस्थित होत्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस, लोकल स्कूल कमिटीचे सदस्य मंदार सांबारी व परेश सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
सौ. सुमेधा सदानंद कांबळी चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवण यांच्या वतीने दरवर्षी मालवण तालुक्यातील एका शाळेतील बालकुमार वाचकांना ही अक्षरभेट प्रदान केली जाते. यंदा निवड समितीच्या माध्यमातून नामदेव शंकर कावले इंग्लिश मीडियम स्कूल, आचरे या शाळेची निवड करण्यात आली होती. कथामालेचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांनी या शाळेची निवड केली होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस यांनी प्रास्ताविकातून या उपक्रमाचे स्वागत केले. त्यानंतर सुगंधा केदार गुरव यांनी साने गुरुजी कथामालेच्या गेल्या पन्नास वर्षांच्या समृद्ध वाटचालीचा आणि विविधांगी उपक्रमांचा आढावा घेतला. कथाकथन स्पर्धांपासून पाणपोई उपक्रमापर्यंत, आरोग्य शिबिरांपासून साने गुरुजी संस्कार परीक्षेपर्यंत बालकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या तब्बल पंचवीस उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. यावेळी अक्षरदान योजनेचे पुरस्कर्ते सदानंद कांबळी यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचेही वाचन करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात सुरेश गावकर यांनी ‘साधना’चा बालकुमार दिवाळी अंक २०२६ हा बालवाचकांसाठी साहित्याची अनोखी मेजवानी असल्याचे सांगितले. भारतातील विविध सहा भाषांमधील ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या कथा या अंकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. गुजराती भाषेतील पन्नालाल पटेल, कोकणी भाषेतील दामोदर मावजो, कन्नड भाषेतील द. रा. बेंद्रे, हिंदी भाषेतील अमरकांत, तमिळ भाषेतील डी. जयकांतन आणि इंग्रजी भाषेतील कॅरेल कॅफेक यांच्या कथा मराठी वाचकांसाठी विश्वास पाटील, शैला मावजो, द्वारकानाथ अरवंदेकर, चंद्रकांत भोंजाळ, मानसी केळकर आणि वि. स. खांडेकर यांनी अनुवादित अथवा रूपांतरित केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना गावकर म्हणाले की, दिवाळीपूर्वी तुमच्या हातात दिलेला हा अक्षरखाऊ केवळ तुमच्यापुरता मर्यादित नाही, तर तो तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी साहित्याचा खमंग फराळ आहे. या अंकाचे मनापासून वाचन करा आणि त्यातील ज्ञान, आनंद व विचारांची गोडी आपल्या कुटुंबीयांसोबतही वाटून घ्या.
यावेळी मंदार सांबारी यांनी साने गुरुजींच्या साहित्याचा संस्कारमूल्यांशी असलेला अतूट संबंध अधोरेखित केला. साने गुरुजींनी बालकांसाठी लिहिलेल्या कथा आजही तितक्याच प्रेरणादायी असून, गेल्या शतकात निर्माण झालेले हे साहित्य पुढील अनेक शतकांतील पिढ्यांसाठी अक्षरखजिना ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले. तर परेश सावंत यांनी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनाही मराठी साहित्याची गोडी लागावी आणि त्यांच्यामध्ये वाचनसंस्कृती विकसित व्हावी, या उद्देशाने कथामालेने राबविलेल्या अक्षरदान उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
कोकण मराठी साहित्य परिषद मालवणकडूनही पुस्तकांची अक्षरभेट!
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसोबतच शाळेतील शिक्षकांच्या वाचनालयालाही साहित्याची अनमोल भेट देण्यात आली. कोकण मराठी साहित्य परिषद, मालवणच्या वतीने शिक्षकांसाठी विविध साहित्यकृती भेट देण्यात आल्या. यामध्ये परिषदेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर लिखित ‘शतदा प्रेम करावे’, ‘शब्दांच्या पलीकडले’ तसेच संपादित ‘सिंधू साहित्यसरिता’ (चरित्रात्मक), ‘बीज अंकुरे अंकुरे’ (ललित), ‘ये ग ये ग सरी’ (काव्य) आणि कोमसापच्या सदस्या उज्वला धानजी लिखित ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ या पुस्तकांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन अस्मिता खेडेकर यांनी केले, तर शीतल केरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी शिक्षिका सीमा पुजारे, रुपाली पाटकर यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
दिवाळीच्या फराळात गोडव्याची भर घालणारे अनेक पदार्थ असतात; मात्र आयुष्यभर सोबत राहणारा ज्ञानाचा गोडवा पुस्तकांतूनच मिळतो. विद्यार्थ्यांच्या हाती दिवाळी अंक आणि शिक्षकांच्या वाचनालयात साहित्यकृती देत साने गुरुजी कथामाला मालवणने अक्षरदानाच्या माध्यमातून ज्ञानदीप प्रज्वलित केला. दिवाळीच्या प्रकाशपर्वात वाचनसंस्कृतीचा हा दीप असाच पिढ्यान्पिढ्या तेवत राहो, हीच या उपक्रमाची खरी फलश्रुती!



