… म्हणून महिलांच्या स्वप्नांना पंख, कर्तृत्वाला सन्मान अन् स्वावलंबनाला मिळाली नवी दिशा! : सौ. वेदिका परब. ; वेंगुर्ल्यात महिला उद्योजिकांच्या कर्तृत्वाचा गौरव सोहळा; इनरव्हील क्लब आणि लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनचा स्तुत्य पुढाकार!

वेंगुर्ला : स्त्रीच्या हातात केवळ संसाराचा गाडा समर्थपणे हाकण्याचेच नव्हे, तर उद्योगविश्वात स्वतःच्या कर्तृत्वाचा झेंडा रोवण्याचेही सामर्थ्य आहे. तिच्या जिद्दीला योग्य व्यासपीठ, स्वप्नांना प्रोत्साहन आणि कर्तृत्वाला सन्मानाची जोड मिळाली, तर ती स्वतःच्या पायावर उभी राहत इतरांच्याही आयुष्यात रोजगाराची नवी पहाट फुलवू शकते. आजची महिला कुठेही कमी नाही. ती आता अबला राहिलेली नसून सबला झाली आहे. गरज आहे ती केवळ तिच्या भावना, आकांक्षा आणि स्वप्नांना सकारात्मक ऊर्जेची साथ देण्याची, असे प्रेरणादायी प्रतिपादन समाजसेविका सौ. वेदिका विशाल परब यांनी केले.

महिला उद्योजिकांच्या जिद्दीला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्या व्यावसायिक वाटचालीला प्रोत्साहन देण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सौ. वेदिका विशाल परब यांनी आपल्या मनोगतातून महिलांच्या अंगी असलेल्या उद्योजकीय क्षमतेचा गौरव करत स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले.

या गौरव सोहळ्यात प्रणया भोसले, स्मिता कासले, भाग्यलक्ष्मी घारे, ज्योती देसाई, सीमा नाईक, सुजाता संदीप देसाई, अक्षता साळगावकर, करिष्मा सोसुरकर, सारिका काळसेकर, सीमा मराठे, प्रणाली अंधारी आणि अस्मिता कुंभार या बारा कर्तृत्ववान महिला उद्योजिकांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सौ. वेदिका विशाल परब आणि सौ. संध्या तेरसे यांच्या हस्ते या उद्योजिकांना मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या व्यावसायिक यशाचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला दाद दिली.

नोकरीच्या संधींच्या प्रतीक्षेत राहण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर व्यवसाय उभा करा आणि इतरांसाठीही रोजगारनिर्मितीचे दार खुले करा, हा या उपक्रमामागील व्यापक आणि विधायक विचार होता. स्वतःच्या मेहनतीच्या बळावर व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महिलांनी आर्थिक स्वावलंबनासोबतच समाजात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या प्रवासात अनेक संघर्ष, अडचणी आणि आव्हाने असली, तरी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी यशाची शिखरे गाठली आहेत. अशा महिलांचा सन्मान म्हणजे केवळ व्यक्तींचा गौरव नसून समाजातील असंख्य महिलांना स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी दिलेली प्रेरणेची हाक असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

यावेळी लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. ज्योती देसाई, सचिव सौ. वृंदा गवंडळकर, खजिनदार डॉ. दिपाली देसाई, सदस्य सौ. शुभदा नवार, सौ. आकांक्षा परब, काजल गिरप आणि दिपाली अभ्यंकर उपस्थित होत्या.

तसेच इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाच्या सचिव सौ. श्रीया परब, उपाध्यक्ष सौ. सई चव्हाण, सौ. आरती गिरप, सदस्य सौ. रसिका मठकर, ॲड. अनुराधा वेर्णेकर, सौ. वैभवी दाभोलकर आणि सौ. हर्षदा शिरसाट यांची उपस्थिती होती.

महिलांच्या कर्तृत्वाला कौतुकाची थाप, स्वप्नांना प्रोत्साहनाची साथ आणि स्वावलंबनाच्या वाटेला सन्मानाची शिदोरी देणारा हा उपक्रम वेंगुर्ल्यातील महिला उद्योजकतेच्या चळवळीला नवी ऊर्जा देणारा ठरला. महिलांनी केवळ स्वतःपुरते यश मर्यादित न ठेवता इतर महिलांसाठीही संधींची कवाडे खुली करावीत, हाच या गौरव सोहळ्याचा प्रेरणादायी संदेश ठरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles