सावंतवाडी : निसर्गसौंदर्याची मुक्तहस्ते उधळण, अथांग सागरकिनारे, हिरव्यागार डोंगररांगा, ऐतिहासिक वारसा आणि समृद्ध लोकसंस्कृती अशा असंख्य वैशिष्ट्यांनी नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वैभवाची महती आता थेट महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचणार आहे. ‘देशातील पहिला पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख मिळविलेल्या सिंधुदुर्गच्या पर्यटन चळवळीला नवी उभारी देण्यासाठी मुंबई दूरदर्शनच्या ‘चला पर्यटनाला’ या विशेष कार्यक्रमात सिंधुदुर्गचे सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

तब्बल तीन दशकांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याला देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून या जिल्ह्याच्या पर्यटन विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. निसर्गाने भरभरून दिलेल्या या भूमीत पर्यटनाच्या असंख्य संधी दडलेल्या आहेत. समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे, जलक्रीडा, साहसी पर्यटन, कोकणी खाद्यसंस्कृती आणि ग्रामीण जीवनशैली यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी आज लाखो पर्यटक सिंधुदुर्गला पसंती देत आहेत. या पर्यटन संपदेचा व्यापक प्रचार-प्रसार व्हावा, पर्यटनाच्या नव्या संधी अधोरेखित व्हाव्यात आणि सिंधुदुर्गचे वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्य देशभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने मुंबई दूरदर्शनचे निर्मिती प्रमुख श्री. राजेश दळवी यांच्या संकल्पनेतून ‘चला पर्यटनाला’ हा विशेष कार्यक्रम साकारण्यात आला आहे.
याच कार्यक्रमांतर्गत ॲड. नकुल पार्सेकर यांची विशेष मुलाखत सोमवार, दिनांक ९ नोव्हेंबर रोजी रात्री ठीक ८ वाजता डी.डी. सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
मुंबई दूरदर्शनच्या निवेदिका श्रीमती रेश्मा उपासे यांनी ही मुलाखत घेतली असून, कार्यक्रम अधिकारी श्रीमती वनिता गौंडाल आणि सौ. रश्मी समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. श्री. गौरव जाधव यांनी चित्रीकरणाची जबाबदारी सांभाळली आहे.
सिंधुदुर्गच्या पर्यटनाची समृद्ध परंपरा, निसर्गसंपदेचे अनोखे वैभव आणि पर्यटन विकासाच्या अमर्याद शक्यता यांचा वेध घेणारी ही मुलाखत निश्चितच प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. कोकणच्या पर्यटन वैभवाचा सुगंध दूरवर पोहोचविणाऱ्या या विशेष कार्यक्रमाला सिंधुदुर्गवासीयांसह पर्यटनप्रेमींनी आवर्जून पाहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
कोकणच्या सौंदर्याला मिळणार दूरदर्शनची झळाळी… ‘चला पर्यटनाला’च्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या पर्यटन वैभवाचा जागर!



