“सावधान!, आज जमीन विकाल, उद्या गाव गमवाल!” -नरकासुराच्या माध्यमातून परुळेत जमिनी वाचविण्याचा अनोखा संदेश! ; शाळा आठवणीतील ग्रुपच्या जनजागृती उपक्रमाचे सर्वत्र कौतुक!

संदीप चव्हाण.

म्हापण : दिवाळी सणानिमित्त गावोगावी नरकासुराच्या प्रतिकृती उभारून उत्साहात सण साजरा केला जात असताना परुळे बाजारपेठेत उभारण्यात आलेल्या नरकासुराच्या माध्यमातून सामाजिक जनजागृतीचा अनोखा संदेश देण्यात आला आहे. ‘जमिनी विकू नका’ असा ठाम संदेश देणाऱ्या येथील शाळा आठवणीतील ग्रुपच्या या उपक्रमाने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून परिसरात तो चर्चेचा विषय ठरला आहे.
नरकासुराच्या पायाखाली लावण्यात आलेल्या फलकावर ‘आज जमीन विकाल, उद्या गाव गमवाल! ही जमीन आपली आहे, आपल्या पुढच्या पिढीसाठी जपून ठेवा,’ असा आशयपूर्ण संदेश लिहिण्यात आला आहे. तर नरकासुराच्या तोंडूनच ‘जमिनी विकल्या तर माझे राज्य येईल’ असा सूचक इशारा देण्यात आला आहे. या अनोख्या मांडणीमुळे जमिनींच्या वाढत्या विक्रीचा प्रश्न प्रभावीपणे लोकांसमोर आला आहे.
कोकणातील निसर्गसंपन्न जमीन ही केवळ मालमत्ता नसून ती गावाची ओळख, संस्कृती आणि पुढील पिढ्यांचा वारसा आहे. आज आर्थिक गरज किंवा आकर्षक मोबदल्याच्या मोहापायी जमिनी विकल्या, तर भविष्यात आपल्या गावातच आपले अस्तित्व धोक्यात येऊ शकते. परकीय प्रवृत्तींचे वर्चस्व वाढून गावाचे मूळ स्वरूप आणि अस्मिता हरवण्याची शक्यता आहे, असा गर्भित इशाराही या संदेशातून देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या ग्रुपने केवळ जमीन विक्रीविरोधातच आवाज उठवला नसून ‘पाणी वाचवा, माती वाचवा, गाव वाचवा’ असा पर्यावरणपूरक संदेशही दिला आहे. दिवाळीसारख्या सणाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नाला वाचा फोडण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.
नरकासुराच्या प्रतिकृतीकडे केवळ एक सणोत्सवी आकर्षण म्हणून न पाहता, त्यातून दिलेला सामाजिक संदेश समजून घेण्याची गरज आहे. कोकणातील जमिनी, निसर्ग आणि गावाचे अस्तित्व टिकवण्यासाठी तरुणाईने पुढाकार घेत सणाला जनजागृतीचे व्यासपीठ बनवले आहे. ‘जमीन ही विकण्याची वस्तू नसून पुढच्या पिढीकडे सोपवायचा अनमोल वारसा आहे,’ हा विचार परुळे येथील शाळा आठवणीतील ग्रुपने आपल्या अनोख्या उपक्रमातून समाजासमोर मांडला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles