सावंतवाडी : शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या बिलांवरून सुरू असलेला वाद आता अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. चौकशी समिती कार्यरत असताना संबंधितांना निर्दोष ठरविण्याची घाई का? असा थेट सवाल उपस्थित करत नगरसेविका ॲड. नीता सावंत-कविटकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला. चौकशी पूर्ण होण्याआधीच भ्रष्टाचार झाला नाही, असे म्हणणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक संजू परब, ॲड. नीता सावंत-कविटकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, नगरसेवक देव्या सूर्याजी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ॲड. सावंत-कविटकर म्हणाल्या की, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर हे निर्दोष आहेत, असे घोषित करण्याचा अधिकार सभागृहाला नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असताना भ्रष्टाचार झालाच नाही, असे विधान करणे चुकीचे आहे. आमच्या नगरसेविकांनी संबंधित बिले रोखून धरली आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही मागणी केली होती.
चौकशी समितीमध्ये मुख्याधिकाऱ्यांचा समावेश करू नये, अशी भूमिकाही आम्ही मांडली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीची दखल घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाबाबत आता पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणात प्रत्यक्ष जबाबदारी निश्चित करण्याऐवजी केवळ जोडारीला बळीचा बकरा बनवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एकूणच, सावंतवाडीतील पाणीपुरवठा योजनेच्या बिलांचा आणि कथित अनियमिततेचा मुद्दा आता राजकीय वर्तुळात तापू लागला असून, चौकशी समितीच्या निष्कर्षांकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. चौकशी निष्पक्षपणे होणार का आणि या प्रकरणात नेमकी जबाबदारी कोणाची निश्चित होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.



