सावंतवाडी : सावंतवाडी बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत तब्बल १२ तोळे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या संशयित पती-पत्नीच्या चोरीचा पोलिसांनी अखेर यशस्वी छडा लावला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सावंतवाडी पोलिसांनी संयुक्तपणे राबविलेल्या धडाकेबाज कारवाईनंतर आरोपींकडून चोरीची कबुली मिळवली. त्यानंतर पोलिसांनी थेट कर्नाटक गाठत त्यांच्या निवासस्थानी लपवून ठेवलेले सुमारे १२ तोळे सोन्याचे दागिने पंचांसमक्ष हस्तगत केले. पोलिसांच्या या तपासकौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सावंतवाडी पोलीस ठाण्यात २१ सप्टेंबर २०२६ रोजी सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासातून सदर चोरी दीपक सकट आणि अमृता सकट यांनी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सावंतवाडी पोलिसांच्या पथकाने कणकवली तालुक्यातील गडनदीजवळ असलेल्या उभादेव मंदिर परिसरात सापळा रचला. पोलिसांच्या या नियोजनबद्ध कारवाईत दोन्ही संशयितांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरी केल्याची कबुली देत लंपास केलेले सोन्याचे दागिने कर्नाटक येथील आपल्या निवासस्थानी ठेवल्याची माहिती दिली.
या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील आणि त्यांच्या पथकाने कर्नाटक येथे धाव घेतली. तेथे पंचांसमक्ष झडती घेऊन चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यामध्ये मंगळसूत्र, कानातले, बांगड्या, हार अशा एकूण १२ तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.
दरम्यान, आज दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून जामीनही मंजूर करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
या उल्लेखनीय कारवाईवेळी पोलीस उपअधीक्षक राजेश भागवत, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार निलेश परब, हेड कॉन्स्टेबल मंगेश शिंगाडे, हनुमंत धोत्रे, अमित राऊळ, मनिष शिंदे, निलेश नाईक, रामदास चव्हाण, श्री. चव्हाण तसेच कॉन्स्टेबल आशिष हिर्लेकर आदी सहभागी होते.
सीसीटीव्ही फुटेजपासून तांत्रिक विश्लेषणापर्यंत तपासाची प्रत्येक कडी जोडत कर्नाटकातील घरातून चोरीचा मुद्देमाल परत मिळवण्यात पोलिसांना यश आले. या धडाकेबाज कामगिरीमुळे सावंतवाडी पोलिसांच्या तपासकौशल्याचे आणि पथकाच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.



