✍️रूपेश पाटील.
सिंधुदुर्ग : शिक्षण हीच समाजपरिवर्तनाची खरी गुरुकिल्ली आणि ज्ञान हीच उज्ज्वल भविष्याची शिदोरी, या उदात्त विचारांना कृतीची जोड देत जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श निर्माण करीत आहे. ज्यांच्या हातात आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक साहित्याचा अभाव आहे, अशा विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाची साधने पोहोचविण्याच्या ध्येयाने संस्थेच्या वतीने उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये तब्बल पाच लाख मोफत वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ समाजसेवक तथा जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये तब्बल ३५ लाख मोफत वह्यांच्या वाटपाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देतानाच त्यांच्या स्वप्नांना नवी भरारी घेण्यासाठी प्रेरणा दिली जात आहे.
केवळ मदतीचे आश्वासन देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून समाजऋण फेडण्याचा वसा घेतलेल्या निलेश सांबरे यांनी गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ समाजसेवेचा अखंड यज्ञ सुरू ठेवला आहे. कोकणातील पाचही जिल्ह्यांतील गरजू नागरिकांसाठी मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देणारी तीन अद्ययावत रुग्णालये, सीबीएसई शाळा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वाचनालये, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रे, संगणक प्रशिक्षण केंद्रे, चाळीसहून अधिक रुग्णवाहिका तसेच महिलांना स्वावलंबी बनविणारी रोजगाराभिमुख प्रशिक्षण केंद्रे अशा विविध लोककल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी हजारो गरजूंच्या आयुष्यात आशेचा दीप प्रज्वलित केला आहे.
विशेष म्हणजे, या सर्व उपक्रमांमागे प्रसिद्धीचा हव्यास नसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याची तळमळ आहे. स्वतः पदरमोड करून समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या सांबरे यांच्या कार्यातून सामाजिक उत्तरदायित्वाची प्रेरणादायी परंपरा निर्माण झाली आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच लाख वह्यांच्या वाटपाची जय्यत तयारी जिजाऊ परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी जिजाऊ परिवाराचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. नकुल पार्सेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सुदर्शन पाटील, श्री. वैभव मसणे, श्री. ओंकार तिवरेकर, श्री. ज्ञानेश्वर निवरेकर यांच्यासह जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत आहेत.
वह्यांच्या रूपाने विद्यार्थ्यांच्या हाती केवळ कोरी पाने दिली जाणार नाहीत, तर त्या प्रत्येक पानावर उज्ज्वल भविष्याची स्वप्ने रंगविण्याची संधी दिली जाणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि शिक्षणाची गंगा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी, हाच या उपक्रमामागील व्यापक हेतू आहे.
समाजासाठी जगणारी माणसेच समाजाच्या इतिहासात अढळ स्थान निर्माण करतात, याची प्रचिती निलेश सांबरे यांच्या कार्यातून येत आहे. मदतीचा हात देताना हजारो हातांना स्वावलंबनाची ताकद देणाऱ्या या सेवायज्ञातून सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला निश्चितच नवी ऊर्जा मिळणार आहे.
एका वहीत अनेक स्वप्नांची बीजे… एका उपक्रमातून हजारो भविष्यांची पायाभरणी… आणि एका सामाजिक संकल्पनेतून शिक्षणसेवेचा कोकणभर जागर!




