मालवणमध्ये उद्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल पंच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने उद्या, रविवार दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता बास्केटबॉल पंच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण येथील टोपीवाला हायस्कूलच्या बास्केटबॉल मैदानावर हे शिबिर संपन्न होणार आहे.
या मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन मालवण एज्युकेशन सोसायटीचे सचिव विजय कामत यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून होणार आहे. या शिबिरात सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय शिंदे हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना यांच्या वतीने पंच व टेबल पंच यांच्या नियमांमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या बदलांची तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या नियमांची माहिती या शिबिरात दिली जाणार आहे. या नियमांचा बौद्धिक व प्रात्यक्षिक सरावही यावेळी करून घेतला जाईल.
येत्या २ डिसेंबर २०२६ पासून ओरोस (सिंधुदुर्ग) येथे कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत. या आगामी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पंचांच्या तयारीसाठी हे उजळणी शिबिर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्व पंच, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक व खेळाडूंनी या शिबिराला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन (मालवण) चे कार्याध्यक्ष विजय मागाडे यांनी केले आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनने राबवलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगत महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जोशी व सचिव गोविंद मुथ्थुकुमार यांनी या पंच मार्गदर्शन वर्गाला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

या मार्गदर्शन वर्गाच्या अधिक माहितीसाठी असोसिएशनचे सचिव अजय शिंदे (९४२३६५४१८६) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles