बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटला असून अजूनही एक मारेकरी बाहेर मोकाट फिरतोय. तर बाकीच्या आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. या निर्घृण हत्येने संपूर्ण राज्य हादरलं आहे. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. याच दरम्यान काल रात्री देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. अत्यंत क्रूरतेने, आणि बेदमपणे मारहाण करून देशमुख यांचा जीव घेण्यात आला. त्यांच्या हत्येचे हे फोटो समोर आले असून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून त्यामुळे बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मंगळवार 4 मार्च रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
संतोष देशमुख यांची क्रूरपण हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी दिली जावी अशी मागणी करण्यात येत आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोप पत्रात, सरपंच देशमुख यांची हत्या नेमकी कशी झाली याचे फोटो समोर आले. त्यानंतर संतापाची लाट पसरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा बंद पुकारण्यात आला आहे. एक दिवस कुलूप लावून शासनाचा निषेध करण्याचे आवाहन या बंददरम्यान करण्यात येत आहे,
हत्येचे फोटो व्हायरल –
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने चार्जशीट दाखल केली आहे. यात 66 पुरावे आणि 184 जबाब महत्त्वाचे ठरले आहेत. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून याप्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. संतोष देशमुख हत्येप्रकरणी दाखल केलेल्या आरोप पत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. त्यातच आता संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली या प्रकरणी, हत्येचा घटनाक्रम दाखवणारे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. फोटोमध्ये आरोपींनी देशमुख यांना केलेली अमानुष मारहाण आणि हत्या कशी केली हे स्पष्टपणे दिसून येते. या हत्येच्या कटात सहभाग असलेले आरोपीही या फोटोत दिसत आहेत. विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे हे सर्वजण या फोटोत पाहायला मिळत आहे. हे फोटो आणि व्हिडिओ अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाच्या स्मार्टफोनवर शूट करण्यात आले होते.