मालवण : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्गच्या वतीने या वर्षापासून गाव पातळीवर व्यसनविरोधी जनजागृती मोहीम सुरू करण्यात येणार आहे. नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता राजेंद्र मुंबरकर यांनी मालवण पोलीस ठाणे येथील पोलीस पाटील मिटिंगमध्ये मालवण तालुक्यातील पोलीस पाटील यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या व्यसनांच्या मुळाशी घाव घालायचा असेल तर आपल्याला आपल्या गावात व्यसनांच्या विरोधात जनजागृती करावी लागेल तरच आपण व्यसनातून आपला गाव मुक्त करू शकतो.
या व्यसनमुक्तीच्या चळवळीत गावातील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला सदस्य, आशा वर्कर, महिला बचत गट, गावातील शाळा महाविद्यालय शिक्षण संस्था, आरोग्य विभाग, सामाजिक -धार्मिक संस्था संघटना या सर्वांच्या सहकार्यातून आपण आपल्या गावात व्यसनमुक्तीची चळवळ उभी करू शकतो परिणामी नव्याने व्यसन करणाऱ्यांच्या संख्येत घट निर्माण करून हळूहळू व्यसनमुक्तीच्या दिशेने गावाची वाटचाल सुरू होईल. या पद्धतीने आपल्याला प्रत्येक गावात जनजागृती कार्यक्रमाची आखणी करावी लागेल. गाव पातळीवर व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करावी लागेल. नशाबंदी मंडळाचा यापुढील वर्षाचा गाव पातळीवर व्यसनमुक्तीची चळवळ उभारणी हा अजेंडा राहणार आहे. अशी माहिती देऊन अर्पिता मुंबरकर यांनी सर्व पोलीस पाटलांना आपल्या गावात हा व्यसनमुक्तीचा अजेंडा घेऊन जाण्याची यावेळी विनंती केली. यावेळी मालवण पोलीस ठाणे निरिक्षक मा. कोल्हे यांना नशाबंदी मंडळाच्या वतीने कलम 47 परत देऊन अंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी मा . कोल्हे यांनी व्यसनांचे दुष्परिणाम सांगून व्यसनमुक्तीच्या चळवळीची गरज असल्याचे सांगितले. यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस बांधव आणि पोलीस पाटील उपस्थित राहून सहकार्य केले. शेवटी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.