Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

पिंगुळीत सोमवारी ‘ग्रामपंचायत आपल्या दारी!’ अभिनव उपक्रमाचे आयोजन, विद्यार्थी व पालकांसाठी विशेष परिसंवादही रंगणार. ; वर्षभर उपक्रम राबविणारी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत.

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पिंगुळी येथे ‘ग्रामपंचायत आपले दारी’ हा अभिनव उपक्रम एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 दरम्यान विविध उपक्रमांनी राबविण्यात येणार आहे. याचा शुभारंभ सोमवार दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडी मिरवणुकीने होणार आहे. असा आगळावेगळा उपक्रम राबविणारे पिंगुळी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत असल्याचा दावा सरपंच अजय आकेरकर यांनी केला आहे. ग्रामपंचायत पिंगुळीतर्फे ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर सरपंच आकेरकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी सागर रणसिंग, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, आर्या बांदेकर, केशव पिंगुळकर, शशांक पिंगुळकर, ग्रामसेवक राजेश निवतकर आदी उपस्थित होते.

यावेळी सरपंच श्री. आकेरकर म्हणाले, ‘ग्रामपंचायत आपल्या दारी.!’ या उपक्रमाचे उद्घाटन सोमवार, दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजीत सावंत यांसह अन्य मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. या मोहिमेत परमपूज्य राऊळ महाराज सेवा ट्रस्ट, परमपूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज सेवा ट्रस्ट, गावातील सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदींची उपस्थिती असणार आहे.

दरम्यान मे व जून महिन्यात शेतकऱ्यांना कृषी विषयी मार्गदर्शन शिबिरे, जुलै व ऑगस्टमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये स्वच्छता मोहिमा, नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये महिलांना रोजगार विषयक मार्गदर्शन वर्ग तर जानेवारी 2026 मध्ये पिंगुळी क्रीडा व सांस्कृतिक महामहोत्सव तसेच विविध क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच फेब्रुवारीमध्ये अपंग कल्याण आर्थिक व सामाजिक मागास उन्नती अभियानांतर्गत विविध सहायता उपक्रम राबविले जातील. असा वर्षभर उपक्रम राबवून पिंगुळी ग्रामपंचायत राज्यात आपला आगळावेगळा ठसा उमटविणार असल्याचाही उल्लेख सरपंच अजय आकेरकर यांनी केला.

विद्यार्थी व पालकांसाठी महत्त्वपूर्ण परिसंवाद –

दरम्यान ग्रंथ दिंडीनंतर परमपूज्य समर्थ राऊळ महाराज सभागृह येथे शालेय मुले व पालक यांच्यासाठी ‘मोबाईल, आजची मुले व पुस्तक’, ‘मुलांचे हरवलेले बालपण’ या विषयांवर मार्गदर्शन व परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, प्रेरणादायी व प्रबोधनात्मक वक्ते प्रा. रुपेश पाटील तसेच मराठी भाषेचे तज्ज्ञ भरत गावडे आदी मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही सरपंच श्री. आकेरकर यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles