एर्नाकुलम : वाचक मंडळींनो, बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड.. इंडस्ट्री कोणतीही असली तरी ड्रग्जशी संबंधित बातम्या समोर येतच असतात. नुकतंच एका मल्याळम अभिनेत्रीने सेलिब्रिटींच्या ड्रग्ज सेवनाबद्दल धक्कादायक खुलासा केला. ‘विंसी अलोशियस’ असं या अभिनेत्रीचं नाव असून यापुढे ड्रग्जचं सेवन करणाऱ्या कलाकारांसोबत कधीच काम करणार नसल्याचं तिने जाहीर केलंय. याबद्दल सांगताना विंसीने तिच्यासोबत घडलेल्या घटना उलगडून सांगितल्या.
केरळमधील पल्लीपुरम चर्चमध्ये आयोजित केसीवायएम एर्नाकुलम-अंगमाली मेजर आर्चडायोसीजच्या 67 व्या कार्यकारी वर्षांत ती म्हणाली, “एखादी व्यक्ती ड्रग्जचं सेवन करत असल्याचं मला समजलं, तर त्यांच्यासोबत मी कोणत्याही चित्रपटात काम करणार नाही.”
“एका सीनच्या सरावादरम्यान त्याच्या तोंडातून काहीतरी पांढरा पदार्थ टेबलावर पडला होता. त्यामुळे तो सेटवर ड्रग्जचं सेवन करत होता, हे स्पष्ट झालं होतं. त्याच्या अशा वागण्यामुळे सेटवरील अनेकांसाठी समस्या निर्माण झाली होती. खासगी आयुष्यात ड्रग्ज वापरणं ही वेगळी गोष्ट आहे, पण जेव्हा त्या गोष्टींचा तुमच्या कामावर आणि कामावरील इतर माणसांवर परिणाम होतो, तेव्हा ते अस्वीकार्य आहे”, असं विंसीने स्पष्ट केलं.
अशा घटनांमुळेच कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटावं म्हणून तिने ड्रग्जचं सेवन करणाऱ्यांसोबत काम करणार नसल्याचं म्हटलंय. “मला अशा पद्धतीने काम करायचं नाही. एखाद्याला आपल्या वागण्याने इतरांवर काय परिणाम होतोय याचीही जाणीव नसेल, तर त्या व्यक्तीसोबत मला काम करायचं नाही. हा निर्णय मी माझ्या वैयक्तिक अनुभवांवरून घेतला आहे”, असं विंसी पुढे म्हणाली.
ADVT –


