सिंधुदुर्गनगरी : महिला आणि मुलींच्या स्वछता आणि आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी पॅड महत्त्वाचे असून राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान सवलत तत्त्वावर आर्थिक तरतूद करण्यासाठी प्रयत्न केले जातील. शासनाने मान्यता दिल्यास आपण आमदार फंडातूनही मोफत इको फ्रेंडली सॅनिटरी पॅड वाटपासाठी आर्थिक मदत केली जाईल, अशी ग्वाही माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी ‘जागतिक मासिक पाळी दिन स्वच्छता दिन’ कार्यक्रमात दिली.
सिंधुदुर्गनगरी येथे बाळशास्त्री जांभेकर पत्रकार स्मारक भवन येथे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन कार्यक्रमानिमित्त आकार फाऊंडेशन, इन्फोसिस फाऊंडेशन यांच्यातर्फे ‘गर्ल्स वेलनेस प्रोग्राम’ यांच्या माध्यमातून आनंदी सॅनिटरी पॅड वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, आकार फाऊंडेशनचे चेअरमन मनीष गुप्ता, संचालक जयदीप मंडल, मारिया फर्नांडिस, माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, शिक्षक, पालक, विद्यार्थी, आशा स्वयंसेवक, आरोग्य सेविका आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी आंगणे यांनी केले तर प्रास्ताविक संचालक जयदीप मंडळ यांनी केले.