Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

वाचन माणसाला विवेकी बनवते.! – ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर. ; चिमुकल्या अस्मी मांजरेकरने घेतलेल्या मुलाखतीत प्रा. बांदेकर यांनी उलगडले साहित्य प्रवासाचे विविध पैलू.

सावंतवाडी : आतापर्यंत जे जे महापुरुष होऊन गेले अथवा आजही जे मोठ्या पदावर कार्यरत आहेत हे सर्वजण वाचनामुळेच मोठे झाले आहे. वाचन ही एक कला आहे. वाचन माणसाला माणूस बनवते. वाचन माणसाला विवेकी बनवते.  जीवनाला एक नवी दिशा देते, विचार करायला शिकवते, त्यामुळे आपण सर्वांनी पुस्तकांशी मैत्री करा. वाचनामुळे मी घडलो, वाचनामुळेच माझ्यातील साहित्यिक निर्माण झाला व मला वेगळी ओळख मिळाली, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी केले.
समग्र शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तर्फे कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय महाउत्सव 2024 अंतगत प्रा. बांदेकर यांची प्रकट मुलाखत आयोजित केली होती. अनेक राज्यस्तरीय , जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील अनेक पारितोषीक विजेती आरपीडी हायस्कूलची विद्यार्थिनी अस्मी प्रवीण मांजरेकर हिने ही मुलाखत घेतली. यावेळी प्रा. बांदेकर यांनी आपल्या साहित्य प्रवासाचे विविध पैलू उलगडले.


आपल्या पहिल्या लेखनाबद्दल बोलताना ते म्हणाले, साहित्य क्षेत्रात एवढा मोठा प्रवास गाठेल असे कधी वाटले नव्हते. मसुरे हायस्कूल येथील शाळेत माध्यमिक शिक्षण घेत असतानाच आपणाला पहिली कथा सुचली असल्याचे ते म्हणाले. त्याचा किस्सा सांगताना ते म्हणाले, शाळेत मॅडमनी कथा पाठ पुस्तक दिले. कथा पाठही केली. पण प्रत्यक्षात स्पर्धेच्या वेळी कथा आठवेना. मग जे काही माझ्या मनाला सुचेल ते बोलत गेलो. कथा संपल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला व नंबरही आला. दुसऱ्या दिवशी मॅडमनी बोलाऊन घेत तू सादर केलेली कथा कोणी दिली असा प्रश्र्न केला. मी स्वतःच तयार केल्याचे सांगितले. त्यावेळी मॅडमना ते खरेही वाटले नाही. पण मला नंतर समजले की ही मी लिहिलेली पहिली कथा. अशा तऱ्हेने शालेय जीवनापासूनच माझा लेखनाचा प्रवास सुरु झाला. शालेय जीवनात असतानाच साने गुरुजींची सर्व पुस्तके वाचली. राजा मंगळवेढेकर यांची पुस्तके वाचली. पुढे भालचंद्र नेमाडे, राजन गवस यांची पुस्तके खूप आवडायला लागली असल्याचे ते म्हणाले.
बालसाहित्याची नेमकी व्याख्या कशी करता येईल, काळानुरूप कोणते बदल अपेक्षित आहेत.. या प्रश्नाला उत्तर देताना प्रा. बांदेकर म्हणाले, लहान मुलांची भावना जपणारे ते बालसाहित्य. बालसाहित्यात लहान मुलांच्या भावना असतात. मुलांना हे साहित्य आपलेच आहे असे वाटले पाहिजे. काळ कितीही बदलला तरी बाल साहित्याचे महत्व कधीही कमी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियाच्या जमान्यातही वाचन संस्कार कसे राहतील, या प्रश्नाला उत्तर देताना प्रा. बांदेकर म्हणाले, उलट सोशल मीडियामुळे आपण वाचनाच्या अधिक जवळ आलो आहे. मात्र काय वाचावे व काय वाचू नये हे आपण ठरवले पाहिजे. इंटरनेट वर आज अनेक दुर्मिळ पुस्तके मिळतात. कुठचीही माहिती एका क्लिक वर आपल्याला मिळते, असे ते म्हणाले. आजच्या मुलांना काय संदेश द्याल, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ज्ञान मिळविण्यासाठी वाचन महत्वाचे आहे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, बॅ नाथ पै यासारख्या महान व्यक्ती वाचनामुळेच घडल्या. त्यामुळे तुम्ही पुस्तकांशी मैत्री करा. भरपूर वाचा. वर्तमानपत्रे वाचा. भविष्यातील स्पर्धेत टिकण्यासाठी वाचनच महत्वाचे असल्याचे प्रा. बांदेकर म्हणाले.
यावेळी प्रा. बांदेकर यांची अभ्यासपूर्ण मुलाखत घेतल्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांनी अस्मी मांजरेकर हिचा सन्मान केला. यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका प्रा. सुषमा मांजरेकर, कवी मनोहर परब, संयोजक विठ्ठल कदम, भरत गावडे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्विय सहाय्यक रामचंद्र आंगणे, सौ. रश्मी आंगणे आदी उपस्थित होत्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles